पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे तसेच याविषयी पाठपुरावा केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करीत ऑक्सर्ड शब्दकोषाच्या धर्तीवर मराठी बोलीभाषेतील नवनवीन शब्दांचा संग्रह वाढीस लागावा याकरिता अभ्यास समिती नेमावी, शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतीला शासनातर्फे पुरस्कार दिले जावेत, सामान्यांना समजतील अशा सुलभ मराठी भाषेत शासन निर्णय, कायद्यांची माहिती दिली जावी, शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाला राज्य शासनाने अनुदान द्यावे, असे ठराव पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात संमत करण्यात आले.
मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचा रविवारी (दि. 22) समारोप झाला. समारोप समारंभात पाच ठरावांना एकमुखी मान्यता देण्यात आली. संमेलनाध्यक्ष शेखर गायकवाड यांच्या वतीने जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी ठराव मांडले.
समारोप समारंभास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तहसीलदार आबा महाजन, महापालिका शिक्षण विभागातील अधिकारी आशा राऊत, जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी, सचिन ईटकर, केंद्र सरकारमधील अतिरिक्त सचिव अनंत पाटील, महापालिका उपायुक्त राजीव नंदकर आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन मंचावर होते.
समारोप समारंभात संवाद साधताना भारत सासणे म्हणाले, लेखन करू इच्छिणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ देणे गरजचे आहे. त्याचप्रमाणे वाचनात आणि लिखाणात सातत्य सांभाळावे. आपल्यातील लेखकावर कधी अन्याय करू नये. महाराष्ट्रात अनेक साहित्य संमेलने होत असतात; परंतु शासकीय अधिकाऱ्यांचे विशेष संमेलन आयोजित केल्यामुळे साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, प्रशासकीय सेवेतील अधिकारी हे लोकसेवक, समाजसेवक आहेत. अनेक अधिकाऱ्यांकडे लेखन वृत्ती असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याने विविध प्रसंगांमधून या लेखकांमार्फत कथाबीजे रुजली जातील. त्यातूनच अनेक साहित्यकृती उलगडू शकतील. याकरिता लेखकांनी व्यक्त होणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. तीन दिवस आयोजित केलेल्या संमेलनाचा दस्तावेज शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे आनंद भंडारी यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले तर राजीव नंदकर यांनी आभार मानले.
शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात पाच ठराव संमत
Date:

