बालरंगभूमी संमेलन सन्मान समारोप सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे बालरंगभूमी परिषदेचे बालरंगभूमी संमेलन बालकलाकारांच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणाने रंगले. संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी (दि. 22) सायंकाळी आयोजित समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत बालरंगभूमीवरील अतुलनीय कार्य केल्याबद्दल प्रतिभा मतकरी यांचा बालरंगभूमी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रतिभा मतकरी बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानित
प्रतिभा मतकरी:सन्मानाला उत्तर देतांना, प्रतिभा मतकरी यांनी सांगितले की, बालरंगभूमी ही नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. बालरंगभूमी यशस्वी होण्यासाठी मी सदोदित प्रयत्न केले. बालरंगभूमी परिषदेने माझ्या कार्याची दखल घेऊन, हा सन्मान मला दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून आता बालरंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी खंबीर पाठबळ मिळाले आहे. त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा.
या पुरस्कार सन्मान सोहळ्याला संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर, डॉ. मोहन आगाशे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, गंगाराम गवाणकर, शैलेश दातार, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार आदी उपस्थित होते. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी शेख, कार्यकारिणी सदस्य धनंजय जोशी, दीपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, आनंद जाधव, त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.
या सन्मानसोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमीवरील कार्यासाठी बालरंगभूमी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच लहान मुलांमुलींसाठी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्री उदय देशपांडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, संगीतकार सलील कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासह भार्गव जगताप, खुशी हजारे, आरुष बेडेकर, मायरा वायकुळ, माऊली व शौर्य घोरपडे, स्वरा जोशी या बालकलाकारांचाही विशेष बालकलाकार गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सन्मान सोहळ्यादरम्यान सिनेनाट्य बाल युवा कलाकारांनी केलेल्या बहारदार सादरीकरणाने बालक व पालक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सन्मान व समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी तर आभार बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर यांनी मानले.
बालरंगभूमी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात बालरंगभूमी परिषदेच्या सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, परभणी, नागपूर, धुळे, कल्याण, बीड, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या शाखेच्या बालकलावंत व दिव्यांग कलावंतांनी सुधा करमरकर मुख्य रंगमंच व सुलभा देशपांडे मुक्त मंचावर सादरीकरण केले. सादरीकरणानंतर या शाखांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दुपारच्या सत्रात मला काही बोलायचंय या बालक, पालक, शिक्षक आणि बालरंगभूमी परिषद प्रतिनिधींच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात अभ्यास महत्वाचा, पालकांच्या अपेक्षा आणि मुले, वाचनसंस्कृती, बालपण हरवलं आहे का, मातृभाषा संवर्धन, मोबाईल चांगला की वाईट, शाळेतील शिक्षा, बालनाट्य कसे असावे, होमवर्कचं टेन्शन, मुले हुशार की मुली हुशार,संवाद लुप्त होतो आहे का या विषयांवर मुलामुलींचे, पालक, शिक्षक यांच्याशी बालरंगभूमी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी केले..