पुणे : शब्दांमध्ये लय असेल तर गाणे तयार होते, सुरांमध्ये लय असेल तर संगीत तयार होते, शरीरामध्ये लय असेल तर नृत्य तयार होते, आणि कार्यक्रमामध्ये लय असेल तर अनुष्ठान तयार होते. अशा प्रयोगशील कार्यक्रमांमधून पुढील पिढीवर संस्कार केले तर उन्मेष, ऊर्जा,उत्साह व रचनात्मकता निर्माण होऊन मनोरंजना बरोबरच संगीत क्षेत्रामध्ये देखील रोजगार निर्मिती व अभिव्यक्तीसाठी प्रोत्साहन मिळेल, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पूर्व कार्यकारी अध्यक्ष डॉ. दामोदर खडसे यांनी व्यक्त केले. तर हिंदी साहित्य अकादमी पुरस्कृत व अनुवादक डॉ .सुनील देवधर आणि स्वरगंधार कलामंचचे अध्यक्ष धनंजय पूरकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. डॉ. सुनील देवधर यांनी शब्द आणि सुरांच्या संगमातून संगीत तयार होते असे प्रतिपादन करुन गीत व संगीताचा पट उलगडला.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत सरहद महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि मराठी वाड्मय मंडळातर्फे *’कवितेतील रूप गीतांचे – कविता मनातल्या हिरव्या पानातल्या’* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना चव्हाण यांनी शब्द आणि अर्थ यांच्या साहचर्यातून निर्माण झालेल्या कवितेला सप्तसुरांची साथ लाभल्यास त्याचे गीत होते आणि या सांगितिक प्रवासाची वाटचाल, स्वरूप व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व त्यांना गीतलेखन व संगीत क्षेत्रामध्ये अभिरुची निर्माण व्हावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे प्रास्ताविकामधून मांडले. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये स्वरगंधार संस्थेचे संस्थापक गोपाळ कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच त्यांनी संगीत कार्यक्रमाचे निवेदन देखील केले. पौर्णिमा साठे, सुदाम कुंभार, राणू कदम, रत्नदीप यांनी मराठी संगीत क्षेत्रातील आशयघन गीते सुमधुर आवाजात सादर केली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेच्या सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक कृष्णी वाळके व स्नेहमंदिर वृद्धाश्रमच्या संचालक सुमन सामंत, सरहद ग्लोबल स्कूलच्या प्रमुख मनीषा वाडेकर, गोपाळ कांबळे, अशोक भांबुरे, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, प्राचार्य डॉ. संगीता शिंदे, मयुर मसूरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रीराज भोर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कोमल मोरे यांनी केले.