हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सव अतंर्गत मातृ-पितृ वंदन कार्यक्रम
पुणे : माता पिताच्या चरणापाशी आम्ही स्वर्ग पाहू… प्रक्षालूनी या पदकमलांना सुमने ही वाहू… असे म्हणत आपल्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ वंदन केले. पारंपरिक पद्धतीने पाद्य पूजन करीत मुलांनी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. तब्बल १ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित मातृ पितृ वंदन केले. कृतज्ञतेचा हा सोहळा भारावणारा होता.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये मातृ-पितृ वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, एमआयटीच्या कार्यकारी संचालक सुनिता कराड, सी.ए. राधेश्याम अगरवाल, डॉ.रूपाली शेठ, सोमकांत शर्मा, एसपीएम इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी, महेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मुजुमदार आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थी आणि संस्थेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मातृ पितृ वंदन केले
कार्यक्रमाची सुरुवात मातृ-पितृ वंदन गीताने झाली. शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपीएम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मम माता देवता’ आणि ‘माता पिताच्या चरणापाशी’ हे समूहगीत सादर केले. यानंतर महेश विद्यालय आणि रुईया मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
अशोक गुंदेचा म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये ‘मातृ देवो भव’ आणि ‘पितृ देवो भव’ असे आई-वडिलांना संबोधले जाते. त्यामुळे त्यांचे स्थान आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभागी होत माता-पित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

