पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील अंबाईदरा भागातील सर्व्हे नंबर ३१ मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या सहा इमारतींवर महापालिकेच्या शहर बांधकाम विभाग झोन क्रमांक २ च्या वतीने कारवाई करत सव्वालाख स्केअर फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिकेच्या जॉ कटरच्या साहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले. जेसीबी, अतिक्रमण पोलिस कर्मचारी, तसेच बिगारी सेवकांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या अनधिकृत इमारतींवर गुरुवारी महापालिकेच्या वतीने कारवाईस सुरुवात केली.यावेळी सुरुवातीला स्थानिक नागरिक व जागा मालकांनी या कारवाईला विरोध केला. मात्र, या विरोधाला न जुमानता महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मदतही घेण्यात आली होती.
पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट गावांचा विकास आराखडा अजून तयार व्हायचा आहे. हा विकास आराखडा तयार करत असताना अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा येत आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी, तसेच बांधकाम व्यावसायिकांनी कोणतीही अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
काल दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी डीप क्लीनिंग ड्राईव्ह अंतर्गत औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय व बांधकाम विकास विभाग झोन-तीन यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ही बाणेर पॅन कार्ड क्लब रस्त्यावरील फ्रंट मार्जिन व पत्रा शेड वर करण्यात आली.सुमारे 16 मिळकतींवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 13500 चौरस फूट क्षेत्र करण्यात आले.सदर कारवाई ही क्षत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त , अतिक्रमण निरीक्षक, पोलीस स्टाफ तसेच बांधकाम विकास विभागातील कार्यकारी अभियंता,उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या कडून करण्यात आली.

