पुणे-स्वारगेट पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे परिमंडळ २ यांच्या कार्यालयातील पोलिसांनी गुटख्याची बेकायदा वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले. साडेआठ लाखांचा विमल गुटखा तसेच दोन टेम्पो असा साडेअठरा लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.सौरभ ऊर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (वय २४) आणि संग्राम रामकृष्ण निंबाळकर (वय २६, रा. श्रीराम सोसायटी, थोरवे शाळेसमोर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संजय भापकर यांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फालेनगर येथे टेम्पोतून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना दिली. परिमंडळ २ यांच्या कार्यालयाकडील पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, अंमलदार पंकज माने, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार राहुल तांबे, कुंदन शिंदे, सागर केकाण तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी निलेश मोकाशी, अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करुन कोठे गुटख्याची वाहतूक होत आहे, याची खात्री केली. तेव्हा फालेनगर येथील लेन नंबर ५ येथील राजक प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानाचे समोरील बाजुला दोन टेम्पो आढळून आले. त्यातील दोघा चालकांना ताब्यात घेतले. दोन टेम्पोमध्ये साडेआठ लाख रुपयांचा विमल पान मसाला, गुटखा जप्त करण्यात आला. त्याबरोबर १० लाख रुपयांचे दोन टेम्पो जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, परिमंडळ २ कार्यालयाकडील सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, स्वारगेट पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.