नागपूर-भाजप आमदार सुरेश धस शनिवारी पीक विमा योजनेतील अनागोंदी कारभारावरून मागील सरकारच्या कृषीमंत्र्यांना म्हणजे धनंजय मुंडे यांना चांगलेच धारेवर धरले. यासंबंधी त्यांनी ‘पीक विम्याचा परळी पॅटर्न’ असा उल्लेख केला. बीड जिल्ह्यातील रामापूर तांड्यावरून 4 हजार हेक्टरचा विमा भरला गेला. मला सांगा तांड्याचे क्षेत्रफळ 4 हजार हेक्टर असते का? कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडावर मारा, असे ते यासंबंधी संतप्त सूर आळवत म्हणाले.
सुरेश धस म्हणाले, अनेक शेतकऱ्यांना 2020, 2023 चा पीक विमा मिळाला नाही. आणि राज्यात काय चाललंय? मी आमदारीसोबतच ऊसतोड मजुरांचेही काम करतो. सभागृहात बंजारा समाजाचा एक आमदार बसलेला आहे. माझ्या माहितीनुसार, बंजारा समाजात चार – पाचच आडनावे आहेत. आमच्या रामापूर तांड्यावरून 4 हजार हेक्टरचा विमा भरण्यात आला. तांड्याचा एरिया 4 हजार हेक्टर असतो का? हे मला कुणीतरी सांगा. कुणाच्या तरी पायातील बूट काढा आणि माझ्या तोंडावर मारा.
त्यांनी यासंबंधी ‘पीक विम्याचा परळी पॅटर्न’ असा उल्लेख करत महायुती सरकारच्या मागील कृषीमंत्र्यांवर (धनंजय मुंडे) गंभीर आरोप केले. ते म्हणाले, रामपूर तांड्यावरील विमा भरलेल्या लोकांची नावे सांगतो. गुट्टे, कुट्टे, होळंबे, कराड, दहिफळे, जयस्वाल. आता मला सांगा बंजारा समाजात जयस्वाल आडनाव कुठून आले? गुट्टे कसे आले? दहिफळे बंजारा कधी झाले? हे मला काही कळेना. आंधळे, मुंडे, लटपटे, चिखलबिडे, केंद्रे ही आडनावे बंजारा समाजात कधी आले? माझ्या माहितीनुसार बंजारा समाजात पाच आडनावच आहेत. एका गावात 2024 चा सुमारे 4 हजार हेक्टरचा विमा भरला गेला. आमच्या तालुक्यातील लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कसे काय भरू शकतात? माझे नाव खामगाव चिखलीला आल्यावर कसे जमेल?
सुरेश धस पुढे म्हणाले, पंतप्रधान पीक विमा योजनेत देशातील कोणत्याही सातबाऱ्यावर कुणाचेही नावे टाकण्यासाठी मला पंतप्रधान मोदींची भेट घेऊन विनंती करावी लागेल. एकट्या सोनपेठ तालुक्यात 13,190 हेक्टरचा बोगस पीक विमा भरला गेला आहे. परळीचा हा नवीन पॅटर्न आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न. हा पॅटर्न सगळीकडे लागू करावा अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करणार आहे. मी या प्रकरणी लवकरच अमित शहा व मोदींची वेळ घेतो. हा परळीचा पॅटर्न सर्वात आधी गुजरात व वाराणसीत लागू करा असे मी त्यांना सांगेन, असे नमूद करत त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
सरकारने 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली. वाजवा ढोल. एक रुपयात विमा, परळी पॅटर्न. राज्याचे कृषीमंत्री कोण, मला त्यांचे नाव माहिती नाही. मी नाव घेणार नाही. 2023-24 चे कृषीमंत्री. 2023 मध्ये थोडे साधले. बीड जिल्ह्याचा 2023 चा 7 हजार हेक्टरचा आकडा मी सांगितला. धाराशिव जिल्ह्यात 2 हजार हेक्टरवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे काय चाललंय? धाराशिव जिल्ह्यात भरण्यात आलेल्या 3 हजार हेक्टरच्या पीक विम्याचे शेतकरी परळी तालुक्यातील आहेत.
माझ्या मतदारसंघात कासेवाडी आंबेवाडी नामक गाव आहे. त्या गावाला महसुली दर्जाच नाही. तेथून 4 हजार हेक्टरचा विमा भरला गेला. आमच्या शेजारच्या परभणी जिल्ह्यातून 40 हजार हेक्टरचा बोगस विमा भरला गेला. आता जगावे की मरावे? की हे राज्य सोडून जावे? आम्हाला पीओकेमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) नेऊन सोडण्याची तरी व्यवस्था करा, असेही आष्टीचे आमदार सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.