श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळा
पुणे : साधूंची कोणतीही जात नसते आणि भक्तांची कोणतीही जात नसते. प्रत्यक्षात अस्पृश्य तोच आहे, जो माणसाचे शरीर प्राप्त करूनही परमेश्वराचा जो भक्त होऊ शकला नाही. याच्यापेक्षा जगामध्ये कोणताही मोठा अस्पृश्य नाही, असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात आठव्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, परमेश्वर आपल्याला भेटू शकतील, मात्र त्याकरिता भक्तीभाव असणे गरजेचे आहे. काहीही केले नाही तरी चालेल, परमेश्वराशी एक नाते निर्माण करायला हवे. परमेश्वर कोणतेही नाते जोडण्यास तयार असतो. फक्त माणसाने भगवंताशी कोणते ना कोणते नाते निर्माण करणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, प्रभू रामाचे आपण आहोत की नाही, हे रामाने ठरवायचे आहे. मात्र, आपण प्रभू श्रीरामांचे आहोत, हे प्रत्येकाने आपल्या भक्तीतून सिद्ध करायला हवे. अनेकजण म्हणतात की लोक आम्हाला समजून घेत नाहीत. पण आपण योग्य जागेवर उभे आहोत का? याचे परीक्षण आपण करायला हवे. आपली किंमत योग्य जागी आहोत की नाही, यावर ठरेल. परमेश्वराच्या शरणागतीमध्ये आलो तर आपण योग्य ठिकाणी आलो, असे म्हणता येईल.
कथा सोहळ्याचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.