हिंदू सेवा महोत्सवात सादरीकरण ; तब्बल १५० हून अधिक कलाकारांचा सहभाग पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, प्रशासन आणि विचार धारेवर आधारित तसेच ज्या ज्या क्रान्तिकारकांनी शिवरायांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी कार्य केले, अशा महावीरांना वंदन करीत शिवगौरव गाथा हे महानाट्य सादर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, यांच्या जीवनाचे पैलू उलगडून दाखविण्यासोबतचा भारतीयांच्या शौर्याचा इतिहास मांडण्यात आला.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये महानाट्य शिव गौरव गाथा चे सादरीकरण झाले. याप्रसंगी डॉ. सुनील काळे, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या प्रशासन व दृष्टीकोनाबद्दल काही प्रसंग यामध्ये आहेत. संख्येने काही शेकडो असलेले मावळे हजारोंच्या मुघल सैन्यलाल कोणत्या प्रेरणेमुळे नामोहरम करू शकले, याबाबी महानाट्यात ठळकपणे दर्शविण्यात आल्या. जिजाऊंचे बालशिवाजींना रामायणातील कथा सांगण्याचे प्रसंग आणि त्यातून संस्कार कसे घडतात, हे देखील दाखविण्यात आले आहे. अफजलखान वध हा गाण्याच्या माध्यमातून सुरेखपणे दाखविण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा फुले, लहुजी वस्ताद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या सारख्या असंख्य पुढारी आणि क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी महान कार्य केले. हे सर्व पात्र त्यांच्या प्रेरणेविषयी महानाट्यात सांगत होते. संजय भोसले लिखित आणि दिग्दर्शित या महानाट्यात भारतीय एकात्मतेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देण्यात आला आहे.
निर्मिती डॉ. जनार्दन चितोडे यांची होती. महानाट्याचे सादरीकरण संवाद, गाणी, पोवाडे आणि आकर्षक नृत्याच्या माध्यमातून केले आहे. नृत्य दिग्दर्शन मयूर वैद्य यांनी केले.
ऐतिहासिक काळात नेणारे नेपथ्य, भव्य असा असा रंगमंच, आकर्षक वेशभूषा आणि उत्तम प्रकाशयोजना या महानात्याची वैशिष्ट्ये आहेत. जवळपास १५० कलाकारांनी हे महानाट्य सादर केले आहे.