मुंबई -काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या रविवारी परभणीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यात ते परभणी हिंसाचारात न्यायालयीन कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. त्यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत.
परभणी शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी सोमनाथ यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता.
पण त्यानंतर पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी परभणीच्या दौऱ्यावर येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी परभणी हिंसाचारावर विधानसभेत निवेदन केले. त्यात त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला नसल्याचा दावा केला. तसेच ते पोलिस कोठडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले होते. सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. तसा उल्लेख त्यांच्या शवविच्छेदन अहवालात आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले, तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होत होती. तशी तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील निवेदनानंतर अवघ्या 10 मिनिटांतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने त्यांचा दावा फेटाळला होता. माझा मुलगा 4 दिवस त्यांच्या ताब्यात होता. माझा मुलगा आजारी होता, तर त्यांनी आम्हाला का बोलावले नाही? आता ते माझा मुलगा आजारी असल्याचा दावा करत होता. पण माझ्या मुलाला कोणतेही व्यसन नव्हते. तो ठणठणीत होता. त्याचा मृत्यू होईपर्यंत पोलिसांनी आम्हाला बोलावले नाही. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होता असे रिपोर्टमध्ये का आले? असा खडा सवाल सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केला आहे.
पीडित आईने यावेळी सरकारने देऊ केलेली 10 लाख रुपयांची मदतही नाकारली आहे. माझा मुलगा आजारी असल्याचे सरकार चुकीचे सांगत आहे. मला त्यांचे 10 लाख रुपये नको. मला केवळ न्याय हवा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.