मुंबई : मराठी माणसांना द्वेष पूर्ण वागणूक देत मारहाण करणाऱ्या माजुर्ड्या अखिलेश शुक्लाला कल्याण पोलिसांनी अखेरीस अटक केली आहे. अखिलेश शुक्ला हा टिटवाळा परिसरात लपून बसला होता. तिथून त्याला अटक करण्यात आली आहे.
कल्याणमधील अजमेरा सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणारा अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केली आहे. डिसीपी अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. यात अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी अखिलेश हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून आरोपीला अटक केली. अखिलेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या व्हिडीओच्या लोकेशनमुळे त्याला अटक करण्यात आली. आमचे टीम टिटवाळा शहर परिसरात आरोपीचा शोध घेत होती. या शोध दरम्यान त्याला पकडलं. त्याची वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर केले जाणार आहे’ अशी माहिती झेंडे यांनी दिली.
तसंच, या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहे. जखमींचा जबाब घेतला आहे. त्यानुसार कलम वाढवण्यात येणार आहे. शुक्लावर आधी सुद्धा काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा सुद्धा आम्ही तपास करत आहोत, असंही झेंडे यांनी सांगितलं.
अखिलेश शुक्लाचा ड्रामा सुरू
दरम्यान, अखिलेशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ” आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. तसंच माझ्या पत्नीवर आधी हल्ला झाला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी मला वाचवलं. तसंच वादादरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आणि माझ्या पत्नीला केसांनी पकडून मारहाण केली, असं आरोपी अखिलेशचं म्हणणं आहे

