श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि नानासाहेब पेशवे स्मारक समितीतर्फे आयोजन
पुणे : सन १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे शिल्पकार नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जन्मदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वेणगाव या त्यांच्या जन्मस्थानी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातून निघालेल्या रायगड व शनिवारवाड्याच्या जलकलश असलेल्या रथाचे वेणगाव येथे दोनशे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. या सोहळ्यात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी झाशीची राणी, भाई कोतवाल यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण केले. वनवासी कल्याण आश्रमाच्या मुलांनी नृत्य सादर केले.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि नानासाहेब पेशवे स्मारक समिती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर पेशव्यांचे वारसदार पुष्कर पेशवे, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्नुषा मेधा कोतवाल, नानासाहेब पेशवे स्मारक समितीचे अध्यक्ष विवेक सुर्वे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे उपाध्यक्ष भाई गायकर , सचिव रमेश मुंढे, कोषाध्यक्ष नितीन कांदळगावकर, रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात, संदीप महिंद गुरुजी उपस्थित होते.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, सन १८५७ ला संपूर्ण देशात क्रांतियज्ञ प्रज्वलित करणारे नानासाहेब पेशवे हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. वेणगाव च्या भूमीने एका राष्ट्रसमर्पित सेनानीला जन्म दिला आहे. महापुरुषांच्या स्मरणाने आपल्याला सुद्धा राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जन्मदिनानिमित्तइतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने पुणे ते वेणगाव अशी रथयात्रा आयोजित केली होती. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले व क्रांतिगुरु लहुजी वस्ताद आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक स्मारक समितीच्या पदाधिका-यांनी रायगड व शनिवारवाड्याच्या जलकलशांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करुन दिला. मोहन शेटे यांनी वेणगाव येथे नानासाहेब पेशवे यांचे भव्य स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी स्मारकासाठी पाच एकर जागा देण्याची घोषणा केली. पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
समीर सोमने यांनी सूत्रसंचालन केले.
नानासाहेब पेशवे द्विशताब्दी जन्म सोहळा वेणगाव येथे जल्लोषात संपन्न
Date:

