अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी ; परिषदेतर्फे २१ व्या अधिवेशनाचे पुण्यात उद्घाटन
पुणे : बदलत्या जीवनशैली बरोबर विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. समाजातील युवा पिढी विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि व्यापार क्षेत्रात आघाडीवर आहे, मात्र ही नेक्स्ट जनरेशन समाजापासून अलिप्त असल्याचे दिसते. समाजकार्य किंवा न्यातीसाठी एकत्र येणे म्हणजे केवळ सीनियर सिटीजन्सचे काम नाही. सामाजिक कार्यात तरुण पिढीचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट, उदयराव गडकरी, दिनकर बायकेरीकर, डॉ.आनंद पेडणेकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, प्रमोद बेनकर, स्वागताध्यक्ष अजय कारेकर, साहित्य संमेलन अध्यक्षा कृष्णी वाळके आदींसह संस्थेचे देशभरातील पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले आहे. कमिटीचे सरपंच अजय कारेकर, चिटणीस अरुणा गडकरी, खजिनदार संजय चाचड, विश्वस्त नंदकुमार पेडणेकर, रत्नाकर काकतीकर यांनी अधिवेशनात आयोजनाकरिता विशेष परिश्रम घेतले आहेत. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
डॉ. गजानन रत्नपारखी म्हणाले, दैवज्ञ समाजातील बहुतांश कुटुंब हे सुवर्णकार व्यवसायात आहेत, आज रशिया – युक्रेन आणि इस्त्रायल – हमास युद्धामुळे या व्यवसायवर मंदीचे सावट पसरले आहे, यामुळे यातील छोट्या कारागिरांना, छोट्या सुवर्ण व्यापाऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव देण्याचा विषय असो की नानांच्या स्मारकाचा विषय असो हे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पाठबळाची आपल्याला गरज आहे. समाज एकत्र असल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सूर्यकांत कल्याणकर यांनी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद संस्थेच्या कामाचा आढावा घेत अधिवेशनाचे महत्व विषद केले. अन्य मान्यवरांच्या मनोगतातून सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन केले.

