हिंदू सेवा महोत्सवात ‘सफर ए शहादत’ लाईट अँड साउंड शो चे आयोजन ; पटियाला येथील २५ कलाकारांचा सहभाग
पुणे : जो बोले सो निहाल, सत श्री अकाल… च्या घोषणांनी स.प. महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. ‘सफर ए शहादत’ या लाईट अँड साऊंड शो मधून शीख समाजाच्या त्यागाची कहाणी पुणेकरांसमोर उलगडली. पटियाला येथील २५ हून अधिक कलाकारांनी यामध्ये सादरीकरण केले.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘सफर ए शहादत’ हा साऊंड अँड लाईट शो सादर करण्यात आला. यावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांसह शिख समाजातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. चरणजितसिंग सहानी यांनी या सादरीकरणाकरिता विशेष पुढाकार घेतला होता. युनायटेड सिंग सभा फाऊंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तर महाराष्ट्र पंजाबी साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य मिळाले आहे.
पंजाबी रंगमंच पाटियला यांनी यामध्ये सादरीकरण करीत माता गुजरी पासून गुरु तेगबहाद्दूर जी, गुरु गोविंदसिंग, साहेबजादे व बंदा बहाद्दूर यांच्यापर्यंत समाजबांधवांवर जे जे अत्याचार झाले, ते नाट्य स्वरूपात सादर केले. दिनांक २२ डिसेंबर २०२४ पर्यंत भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

