शुक्ला कुटुंबीयांवर गुन्हा
नागपूर- मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला नामक अमराठी व्यक्तीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून (MTDC) निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्समध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना गुंडांकरवी मारहाण केली होती. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पोलिसांनी शुक्लावर गुन्हा दाखल केला. पण त्यांना अटक करण्यात दिरंगाई झाली. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी शुक्रवारी हा मुद्दा विधानपरिषदेच्या पटलावर मांडला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत निवेदन करत अखिलेश शुक्ला यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून निलंबित करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सभागृहाला मुंबई व परिसरातील मराठी माणसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्यावर व त्याच्या पत्नीवर मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर खडकपाडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरची कॉपी माझ्याकडे आहे. त्याला तत्काळ निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील कारवाई पोलिस करतील. या प्रकरणी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, होता व राहील. कधीकधी काही नमुणे अशी चुकीची विधाने करतात, माज आणल्यासारखे करतात, पण सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही.
भाजपचे सरकार आले म्हणून ही घटना घडली असे नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात मुंबईबाहेर गेला, वसई-विरारला गेला याचा शोध आपण घेण्याची गरज आहे. मराठी माणूस आज 300 चौरस फुटांच्या घरात राहतो. याऊलट मोठ्या फ्लॅटमअध्ये कोण राहतो याचाही शोध घ्यायला हवा. उत्तर प्रदेश, बिहारमधून येथे आलेले लोक आपल्यासारखे उत्तम मराठी बोलतात. आपल्यासारखेच सण उत्सव साजरा करतात. पण त्यापैकी काहीजण चुकीचे बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतो. मी त्यांना ठणकावून सांगतो की, सरकार मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
संविधाने प्रत्येकाला काय खायचे याचे स्वातंत्र्य दिले आहे. घर नाकारण्याचा अधिकार कुणालाही नाही. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो, तर त्यांची संघटना तयार करू शकतो. योजना तयार करू शकतो. शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्यांचा तिरस्कार करण्याचे कोणतेही कारण नाही. पण याचा फायदा घेऊन कुणी भेदभाव करत असेल तर ते मान्य होणार नाही. अशा तक्रारी आल्या तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले, आपल्या देशात अनेक परंपरा आहेत. बंगालमधील सर्व समाज मासळी खातात. काही राज्यांत संपूर्ण शाकाहार आहे. आपल्या परंपरेने निर्गुण निराकार व सगुण साकार यांना दैवत्त्वाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपल्या देशाचे है वैविध्य टिकले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. पण राष्ट्रीय अस्मितेनंतर मराठी ही आपली क्षेत्रिय अस्मिता आहे. त्यावर कुणी घाला घालणार असेल, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.