पुणे: “मागील काही वर्षांपासून वडगावशेरी मतदारसंघातली पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. नागरिक त्रस्त झाले असून त्यांना यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर ठोस उपाययोजना राबवणे क्रमप्राप्त असल्याने वाघोली-शिरूर दरम्यान पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे”, अशा आशयाचे निवेदन आमदार बापूसाहेब पठारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान बापूसाहेब पठारे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान संवाद साधत मतदारसंघातील वाहतूक कोंडी संबंधित परिस्थीती मांडली. गडकरी यांनीही या समस्येवर उपाययोजना राबवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
येत्या फेब्रुवारी महिन्यात सदर पुलाच्या कामाचे भूमिपूजन होईल, असा विश्वास पठारे यावेळी व्यक्त केला.
बापूसाहेब पठारे मागील चार दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाला उपस्थित आहेत. अधिवेशनात त्यांनी वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्याची ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. तसेच, लोहगाव येथे ससून रुग्णालयाच्या धर्तीवर उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्याबाबतही मागणी केली.
निवडून आल्यानंतर पठारे यांनी मतदारसंघात पाहणी दौरा करून विविध समस्यांचा आढावा घेतल्याचे दिसून येते. पठारे यांनी सुरू केलेले काम मतदारसंघाचे चित्र नक्की पालटणार, असा आशादायी सूर नागरिकांमधून ऐकायला मिळतोय.