पुणे-
लोहगाव येथून महाड येथे लग्नासाठी जाणार्या खासगी बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला असून त्यात ५ जण ठार झाले तर २७ जण जखमी झाले आहेत.हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सर्व २७ जखमींना माणगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातात ३ महिला व २ पुरुषांचा मृत्यु झाला आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव अशी चार मृत्यु पावलेल्यांची नावे असून एका पुरुषाचे नाव अजून समजलेले नाही.
याबाबत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांनी सांगितले की, पुण्याहून खासगी बस (एम एच १४ जी यु ३४०५) महाड येथे लग्नासाठी जात होती. ताम्हिणी घाटात एका वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटले व बसने कठड्याला धडक दिली. त्यानंतर घाटात खाली काही अंतरावर पलटी झाली. बस पलटी झाल्याने बसखाली दबून ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. जाणार्या येणार्यांनी याची माहिती दिल्यावर पोलीस,रुग्णवाहिका व रेस्क्यु पथक तातडीने तेथे रवाना झाले. त्यांनी बसमधील २७ जखमींना माणगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
लोहगाव येथील जाधव कुटंबीय महाडमधील बिरवाडी येथे लग्न समारंभाला जात होते. त्यावेळी ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून बस पटली झाली, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी सांगितले.