संतोष देशमुख प्रकरणाची पाळेमुळे खोदणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही; आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची घोषणा
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावर सविस्तर निवेदन केले. त्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सर्वच पाळेमुळे खोदणार असल्याचे सांगितले. आरोपींवर मकोकांतर्गत कारवाई करण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी दिली.देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडच्या मस्साजोगमध्ये एक गंभीर घटना घडली. संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली, इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील. त्यातून बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे लॉलेसनेसची परिस्थिती पहायवास मिळत आहे, ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल.
आवाडा एनर्जी कंपनीने एक मोठी गुंतवणूक हरित ऊर्जा प्रकल्पात बीड जिल्ह्यात केली आहे. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. यामुळे काही लोक ही कामे आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि देणार नसाल तर आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकेत वावरत आहेत. साधारणतः 6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान मस्साजोग येथे आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आदी आरोपी चालून गेले. प्रथम त्यांनी तेथील वॉचमन अमरदिप सोनवणे याला मारहाण केली. त्यानंतर तेथील सीनिअर मॅनेजर शिवाजीराव थोपटे यांना शिवीगाळ मारहाण केली. त्यानंतर वॉचमनने स्थानिक सरपंच संतोष देशमुख यांना माहिती दिली.
त्यानंतर संतोष देशमुख घटनास्थळी गेले. आपल्या गावच्या माणसांना दुसऱ्या गावची माणसे मारहाण करत असल्याचे पाहून त्यांनी आरोपींना हुसकावून लावले. यावेळी त्यांच्यात थोडीफार मारहाणही झाली. या घटनेनंतर 2 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. हा संपूर्ण घटनाक्रम तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहे, असे फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण कशी झाली? याचा घटनाक्रमही सांगितला. ते म्हणाले, आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर प्रथम त्यांना गाडीतच मारहाण केली. त्यांनी बांधकामासाठी लागणाऱ्या तारांची गुंडाळी करून देशमुख यांना मारहाण केली. त्यानंतर गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. ज्यावेळी देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले त्यावेळी आरोपी त्यांना सोडून पळून गेले. या सर्व प्रकरणात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांच्या संपर्कात होता. विष्णू चाटे त्यांना 20 मिनिटांत सोडतो, 15 मिनिटांत सोडतो असे सांगत होता. पण त्यांनी त्याला सोडले नाही. त्यांनी संतोष देशमुख यांना प्रचंड मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अत्यंत दुर्दैवी प्रकारचा मृत्यू आहे.
संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले नाही. त्यांच्या डोळ्यावर मारहाण करण्यात आली. पण ही घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी काहीजण उशिरा गुन्हा दाखल झाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 6 तारखेच्या घटनेची प्रोजेक्ट इंजिनिअर शिवाजी थोपटे यांनी दिली होती. त्यात त्यांनी स्वतःला मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 4 दिवसांनी अतिरिक्त फिर्याद अमरदिप सोनवणे यांची दिली. सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली. या प्रकरणी गत 29 नोव्हेंबर रोजीही एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांची एकमेकांशी संबंध आहे. याची चौकशी केली जाईल. मी सभागृहाला आश्वस्त करतो की, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतले.वाल्मिक कराडचा एका गुन्ह्यात हात असल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यावर कारवाई होईलच. पण या गुन्ह्यातही त्याच्याविरोधात पुरावे आढळले, तर त्याच्यावरही तो कोणत्या पक्षाचा आहे, कुणाचा सहकारी आहे, त्याचे कुणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल. कारण, बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे, विशेषतः काही सदस्यांनी सांगितले की, कुणावरीह 307 लावायच्या, कुणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या हे अतिशय चुकीचे घडत आहे. यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी या प्रकरणी वस्तुस्थिती तपासून कारवाई केली पाहिजे. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाही.
बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची पाळेमुळे आम्ही खोदून काढू. त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल होईलच. पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांवरही मकोका अंतर्गत लावण्यात येईल. या घटनेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध असणाऱ्या प्रत्येकावर त्यांनाही संघटित गुन्हेगारी समजून मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. बीड जिल्ह्यातील वाळू माफिया, भूमाफिया आणि वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणाऱ्या लोकांविरोधात एक मोहीम हाती घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल.
प्रस्तुत प्रकरणात सरकार दोन प्रकारची चौकशी केली जाईल. एक आयजी स्तरीय अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार करण्यात आली. ही एसआयटी या प्रकरणाचा सविस्तर तपास करेल आणि दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. ही चौकशी 3 ते 6 महिन्यांत पूर्ण केली जाईल. कुणाच्या जिवाचे मोल पैशांत करता येत नाही. पण मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची मदत केली जाईल.