मुंबई-सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 आणि 19 डिसेंबर 2024 रोजी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 2.073 किलो सोने जप्त केले. या सोन्याची अंदाजे किंमत 1.48 कोटी रुपये आहे. मुंबई सीमाशुल्क विभाग III ने या संदर्भात दोन व्यक्तींना अटक केली आहे.
18 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या पहिल्या प्रकरणात, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी एका खाजगी विमानतळ कर्मचाऱ्याला 03 अंडाकृती कॅप्सूल आणि या कॅप्सूल ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या मोज्यांसह सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्याने त्या अंडाकृती आकाराच्या कॅप्सूलमध्ये 24 कॅरेट शुद्धतेचे 1.363 किलो वजनाचे गोल्ड डस्ट वॅक्समध्ये लपवल्याचे आढळून आले. या सोन्याची अंदाजे किंमत 96 लाख रुपये आहे. अधिक चौकशीत, खाजगी विमानतळ कर्मचाऱ्याने कबूल केले की हे सामान मुंबई विमानतळाबाहेर तस्करी करण्याच्या उद्देशाने ट्रांझिट प्रवाशाने त्याच्याकडे दिले होते. या खाजगी विमानतळाच्या कर्मचाऱ्याला 1962 च्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
काल १९ तारखेला घडलेल्या दुसऱ्या प्रकरणात, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी स्पॉट प्रोफाइलिंगच्या आधारे जेद्दाहून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाला अडवले.त्यावेळी या प्रवाशाकडे 24 कॅरेट शुद्धतेचे एकूण वजन 745.00 ग्रॅम गोल्ड डस्ट आढळून आले. ज्याचे निव्वळ वजन 710.00 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 52 लाख रुपये आहे.प्रवाशाने हे सोने आपल्या शरीरात लपवून ठेवले होते. या प्रवाशाला सीमा शुल्क कायदा 1962 अंतर्गत अटकही करण्यात आली आहे.