पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, 2013 अंतर्गत स्थानिक तक्रार समितीवरील अध्यक्षा व सदस्य पदांवरील नियुक्तीबाबतचे निकष निश्चित करण्यात आले असून इच्छूकांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास 31 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक तक्रार समितीमध्ये 1 अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अध्यक्ष या पदाकरीता सामाजिक कार्याचा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या महिला असावी. सदस्य पदाकरीता महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संस्था, संघटना किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती असावी. या दोन सदस्यांपेकी एक सदस्य महिला असावी. परंतु, दोन सदस्यांपैकी एका सदस्यांना कायदयाचे ज्ञान असावे किंवा त्यांची पार्श्वभुमी ही कायद्याच्या क्षेत्रातील असावी. तसेच एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.
“लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्तीमध्ये “समाजिक कार्य” या क्षेञात महिला सक्षमीकरणास अनुकूल सामाजिक परिस्थितीच्या निर्मितीबाबत आणि विशेषत: कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले सामाजिक कार्यकर्ते तसेच कामगार, सेवा, दिवाणी किंवा फौजदारी कायद्यांशी परिचित असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 29/2, गुलमर्ग पार्क कोऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, तिसरा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ, पुणे 411011 तसेच lcpune2021@gmail.com या ईमेल पत्त्यावर ९९६०७७४८५७ भ्रमणध्वनी क्रमाकांवर सपंर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांनी केले आहे.