पुणे-
केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (CWPRS) आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्स (ISH) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हायड्रॉलिक्स, वॉटर रिसोर्सेस, रिव्हर आणि कोस्टल इंजिनिअरिंग – HYDRO 2024 इंटरनॅशनल” या 29व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले.
18 ते 20 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेमधे हायड्रोलिक्स, जलस्रोत, नदी अभियांत्रिकी आणि किनारपट्टी व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर आमंत्रित व्याख्याने, संशोधन पेपर सादरीकरण तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपायांना पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
केद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे HYDRO 2024चे उद्घाटन केले. देशातील जल जीवन मिशन, अटल भूजल योजना, जल शक्ती अभियान, जल सुरक्षा व स्वच्छता आदी प्रमुख राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये CWPRS च्या योगदानाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. जलशक्ती मंत्रालय सचिव देबश्री मुखर्जी यांनी ही व्हिडीओ संदेशाद्वारे जल परिषदेस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी, CWPRS चे संचालक डॉ. आर. एस. कांकरा, इंडियन सोसायटी ऑफ हायड्रोलिक्स (ISH) चे उपाध्यक्ष प्रो एच एल तिवारी, जे चंद्रशेखर अय्यर, माजी अध्यक्ष, केंद्रीय जल आयोग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, सचिव डॉ एम रविचंद्रन, संशोधन केंद्राचे अतिरिक्त संचालक आणि जल परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रभात चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, ISH पुरस्कार जसे की ISH जीवनगौरव S.N. गुप्ता स्मृती व्याख्यान, प्रा.आर.जे. गार्डे संशोधन पुरस्कार, आयएसएच जर्नल रिव्ह्यूअर अवॉर्ड, जल विज्ञान पुरस्कार (आयएसएच जर्नलमधील सर्वोत्कृष्ट पेपर), आयएसएच सर्वोत्कृष्ट पीएचडी थीसिस पुरस्कार इत्यादींचे वितरणही करण्यात आले. यंदाचा इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्स (आय एस एच) जीवनगौरव पुरस्कार CWPRS चे माजी सहसंचालक, ISH चे माजी अध्यक्ष प्रमोद देवळालीकर यांना देण्यात आला.
या वेळी जल परिषद 2024 ची स्मरणिका आणि केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या सुधारित संकेत स्थळाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या परिषदेत 350 संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत.