नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष आंबेडकरविरोधी, संविधानविरोधी, आरक्षणविरोधी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. काँग्रेसनं देशात आणीबाणी लागू केली आणि आता हाच पक्ष संविधानाचा अपमान झाल्याची भाषा करत आहे. राज्यसभेतील माझ्या विधानाची मोडतोड करुन ते दाखवण्यात आलं. माझं पूर्ण विधान दाखवा. मग तुम्हाला सत्य समजेल, असं शहा म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.’मी कधीही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करु शकत नाही. माझं विधान तोडूनमोडून दाखवण्यात आलं. मी नेहमी आंबेडकरांच्या विचारांवर चालत आलो आहे. संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात भाजपनं केली,’ याची आठवण शहांनी करुन दिली. ‘ज्या समुदायासाठी आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, त्या समाजातून येणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांनी तरी किमान काँग्रेसच्या कुत्सित प्रयत्नांचा भाग व्हायला नको होतं. पण खरगेंनी राहुल गांधींच्या दबावाखाली येऊन पत्रकार परिषद घेतली,’ असा दावा शहांनी केला.
‘काँग्रेसकडून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस आता हतबल झाली आहे. आंबेडकरांचा अपमान काँग्रेसनं कसा केला हे आता जगजाहीर आहे. भाजप कायम आंबेडकरांच्या विचारांवर चालत आलेला आहे. काँग्रेसनं आयुष्यभर आंबेडकरांचा अपमान केला. मी स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करु शकत नाही. त्यामुळे माझं विधान पूर्ण दाखवण्यात यावं,’ असं आवाहन त्यांनी केलं.