छगन भुजबळ यांचा OBC एल्गार पुकारण्याचा निर्धार
‘कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर’
नाशिक – मला सध्या गावागावातून व जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येत आहेत. भुजबळ साहेब या, ताकद वाढवा असे लोक म्हणत आहेत. हे खरे आहे. मी आता संपूर्ण राज्यात जाऊन ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. मी ओबीसींचा लढा आमदार म्हणून सभागृहात लढेल. तिथे कितीही बंधने आली तरी रस्ते आमच्यासाठी मोकळे आहेत. यावेळी त्यांनी… मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी… अशी शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले.राज्यमंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात राज्यभरात रान पेटवण्याचे संकेत दिलेत. माझ्या मनात अवहेलनेचे शल्य डाचत आहे. त्यामुळे मी आता राज्यव्यापी दौरा करून ओबीसींचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात आपल्यावर अनेक संकटे येतील, पण आपल्याला सावधपणे पुढे जावे लागेल, असे ते म्हणालेत. भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ समर्थकांचा बुधवारी नाशिकच्या येवल्यात मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले, मी मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी तुमच्यासाठी संघर्ष करेल. हा संघर्ष करतानाच मी शेवटचा श्वास घेईल. त्यात मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे आपले प्रश्न असतील, तिथे आपण एकजुटीने राहू. मी कायम तुमच्यासोबत असेल. हिंमत ठेवा. वाटा पाहा. तोपर्यंत आपले काम सुरू ठेवा. कदाचित पुढे आणखी एखादे मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला एल्गार करावाच लागेल.
मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी प्रफुल पटेल यांनी पराकाष्ठा केली. सुनील तटकरेंनीही केली. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा आग्रह धरला. ते सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते. हे चुकीचे आहे असे करू नका असे ते म्हणाले. पण शेवटी मला घेतलेच नाही. आता हे झाले ते झाले, कुणी केले, याने केले, त्याने केले असे काही नाही. कोणत्याही बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. प्रत्येक पक्षाचा नेता, विधिमंडळाचा नेता तोच त्या पक्षातील निर्णय घेत असतो, असे सांगत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.
भुजबळ पुढे म्हणाले, हा माझ्या मंत्रिपदाचा प्रश्न नाही, समाजाचे जे प्रश्न उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? हा खरा प्रश्न आहे. मंत्रिपदे किती वेळा आली आणि गेलीत. विरोधी पक्षातही बसावे लागले, पण त्याचे दु:ख नाही. ओबीसींनी महायुती सरकार आणले मग असे का? यामागचा हेतू काय? असा प्रश्न आहे. मंत्रिपद नसले तरी रस्त्यावर लढू, सभागृहात भांडू पण थेट अवहेलना करण्याचे शल्य मनात डाचत आहे.
घाईघाईत प्रश्न सुटत नाही. विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. त्यावेळी मला तुमची साथ हवी. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, शक्ती एकटवण्यासाठी निदर्शने सुरू राहतील. संयमाने सगळे करावे लागेल. जिथे जिथे मला आमंत्रण येणार तिथे मी जाणार आहे. मंत्रिपदावर नसलो तरी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, शेवटचा श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढणार आहे. कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाही. मी तुमच्यासोबत राहणार आहे. अनेक राज्यातील, देशातील लोक आपल्यासोबत आहेत. हिंमत ठेवा, वाट पाहा. पुढे आणखी काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पेटवावा लागेल, असे नमूद करत भुजबळांनी यावेळी स्वपक्षालाच आव्हान देण्याचे संकेत दिले.
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आले. पण आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे. परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, असे म्हणत छगन भुजबळांनी यावेळी राष्ट्रवादीसह महायुतीलाही सूचक इशारा दिला.
छगन भुजबळ म्हणाले, आमदार होणे किंवा मंत्री होणे हे माझे काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊन 17 नोव्हेंबरला इकडे आलो नसतो. मी राजीनामा दिला होता, पण त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. कारण मला तसे सारखे फोन येत होते. त्यानंतर अडीच महिन्यांनी मी राजीनामा दिल्याचे उघड केले होते. माझ्याविरोधात अर्वाच्य बोलण्यात आले तेव्ही मी ती गोष्ट उघड केली.
आता प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसे आपल्याकडे आहेत. पण कुणीही दुःखात राहण्याचे कारण नाही. ‘कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर’, असे ते उपस्थितांचे मनोबल वाढवताना म्हणाले.
छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे व मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले, 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर देशभरातील इतर राज्यांतील आंदोलने शमली होती. पण मराठा समाज हा ईडब्ल्यूएसमध्ये साडेआठ टक्के आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे हे माझे नव्हे तर त्यांचेच म्हणणे आहे. मी मार्ग काढण्यास तयार आहे, पण तुमच्याशी चर्चा करण्यास नाही.
आपण कुणीही मराठा विरोधी नाही. पण आपल्यावर कुरघोडी करण्याचा जो कुणी प्रयत्न करत आहे, त्यांना विरोध करणे हे तुमचे व माझे काम असणार आहे. पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरे जाळा, शिक्षणसंस्था जाळा या घटना सहन केल्या जाणार नाहीत. त्यावेळी ते घडले आणि मी त्या संकटात उभा राहिलो होतो. तेव्हा जनताच नव्हे तर नेतेही घाबरले होते. पण त्यावेळी हा छगन भुजबळ एकटा उभा टाकला होता.
छगन भुजबळ म्हणाले, आपण सर्वजण एकजूट झालो. ओबीसी मंडळी एकजूट झाली. त्यामुळे एक है तो सेफ है हे आपल्याला अशाही पद्धतीने समजले. आपण एकजूट राहिलो तरच सुरक्षित राहू हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. ओबीसी आरक्षण मिळाले तेव्हा त्यात 250 जाती होत्या, आता हा आकडा 375 वर गेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
आपली माणसे राजकारणात अजूनही कच्ची आहेत. जे निवडून येतात ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यांचे काही चुकत आहे असे मी म्हणणार नाही. पण माझ्याही मतदारसंघात एक सलाईन लावलेला महाशय आला होता. माझे काय होणार हे मला माहिती नाही पण या माणसाला पाडा म्हणजे पाडा असे तो म्हणाला होता. त्यामुळे माझी 60 ते 70 हजार मते कमी झाली. हिंदू – मुस्लिम या सर्वांची मते कमी झाली. दलित, ओबीसी, गुजराती आदी सर्वच समाज एकत्र आले आणि मला निवडून दिले, असे ते म्हणाले.

