नवी दिल्ली-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात शरद पवार यांनी मोदींना 98 व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. तसेच यावेळी त्यांच्याशी काही राजकीय मुद्यांवरही चर्चा केली. त्यामु्ळे या भेटीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहे.विशेष म्हणजे काँग्रेसने संसदेत अदानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अवमाननेच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे
नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान 98 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी, 1 दिवस अगोदर मंगळवारी त्यांनी फोनवरून मोदींशी संपर्क साधला होता. मोदींच्या भेटीनंतर शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांशी केवळ 5 मिनिटे भेट झाली. त्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या. त्यावर पंतप्रधानांशी चर्चा झाली. राजकीय मुद्यांवर कोणतीही चर्चा झाली. साताऱ्यातील 2 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोग करून शेती केली. ते दोन्ही शेतकरीही माझ्यासोबत होते.
.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जातात. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांचे पंतप्रधान मोदींशीही सुमधूर संबंध आहेत. मोदी व पवार या दोघांनीही अनेकदा एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. मुंबईत अदानी यांच्या धारावी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. याशिवाय मंत्र्यांचे खातेवाटपही रखडले आहे. त्यामुळे शरद पवारांनी मोदींशी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले असले तरी महाराष्ट्रातील बदलले समीकरण, शिवसेना नेत्यांची विधाने व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर उभयंतांत झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.