पीएमपीएमएल बस मध्ये चोऱ्या वाढल्या -कात्रज ते स्वारगेट ते गाडीतळ हॉट स्पॉट
पुणे-धनकवडी ते पद्मावती परिसरातून पीएमपीएल बसने प्रवास करणार्या महिलेचा गर्दीतही पाठलाग करून चोरट्यांनी त्यांच्याकडील २ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी आंबेगाव याठिकाणी राहणार्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी ते पद्मावती पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील १० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे अडीच लाखांचे दागिने असा ऐवज चोरून नेला. काही वेळानंतर महिलेला पिशवीतील ऐवजाची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार तपास करीत आहेत.
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
खराडी परिसरात राजाराम पाटीलनगर येथे एका मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पुणे गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकेश राजकुमार पुरी (वय -२३, रा. चौधरी वस्ती, खराडी,पुणे ) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी (चंदननगर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील राजाराम पाटीलनगर परिसरात एका इमारतीत मसाज पार्लरमध्ये छुपा पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मसाज पार्लरच्या नावाखाली आरोपी पुरीने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पुढील तपास करत आहेत.
घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
घरात शिरून चोरट्यांनी कपाटातील १ लाख ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली. ही घटना वडगाव शेरीतील शिलानंद सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी धाया चव्हाण (वय ४६) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार छाया चव्हाण कुटूंबियासह वडगाव शेरीतील शिलानंद सोसायटीत राहायला आहेत.चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला त्यानंतर त्यानंतर कपाटातील पावणेदोन लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या चैनवर डल्ला मारला. याप्रकरणी उशिरा चोरीची माहिती झाल्यानंतर छायाने तक्रार दाखल केली आहे. पोलिस अमलदार एस आखाडे पुढील तपास करीत आहेत.