काँग्रेस, ठाकरे, पवार मला विश्वासात घेत होते:पण राष्ट्रवादीत तिघेच निर्णय घेतात; भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर आरोप
नाशिक/येवला –
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर आपल्या समर्थकांसमोर त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे.येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला-लासलगावचा किल्ला आपण लढवला, तुमचे आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते. विशेष करून मराठा समाजाचे आभार. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात घडवला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत केवळ माझा कोणताही हस्तक्षेप नसतो. आमच्या पक्षात केवळ अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी केला. त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे व शरद पवार मला विश्वासात घेत होते, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान मिळाले होते. यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतानाही आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की नाही हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असल्याचेही संकेत दिले. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात. चर्चेत किंवा निर्णय प्रक्रियेत माझा सहभाग शून्य आहे. आमदारकीचे कुणाला तिकीट द्यायचे हे सुद्धा मला माहिती नसते. खासदारकीची उमेदवारी कुणाला द्यायची? हे ही मला माहिती नाही. मंत्री कुणाला करायचे? हे ही आम्हाला ठावूक नाही. हे केवळ त्या तिघांनाच ठावूक असते. आम्ही या पक्षात आमची सिनिअॅरिटी घेऊनच आलो होतो. यापूर्वी शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्हाला विश्वासात घेतले जायचे. पण इकडे असे काहीच होत नाही.
मी माझ्या कार्यकर्त्यांपुढे माझी व्यथा मांडली आहे. नक्की काय झाले हे त्यांना समजले पाहिजे. मी त्यांना सगळा इतिहास सांगितला. पूर्वी काय झाले? आता काय झाले? मागच्या 4-6 महिन्यात काय झाले? व मागील 8-10 दिवसांत काय झाले? हे सर्वकाही सांगितले आहे. त्यानंतर त्यांनीही मला मी घेईल त्या निर्णयामागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे, असे छगन भुजबळ म्हणालेत.
छगन भुजबळ यांनी यावेळी आपला उद्धव ठाकरेंसह शरद पवार व त्यांच्या पक्षातील सर्वच नेत्यांशी आपले चांगले संबंध असल्याचेही स्पष्ट केले. मी उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलतो. मी मागे शरद पवारांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याशीही बोलणे होते. सुप्रिया सुळेंशी कधी – कधी बोलणे होते. त्यात काय आहे? पूर्वी आम्ही एकत्र काम केले आहे. अशा विशिष्ट प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू असते, असे ते म्हणाले.

