‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
पुणे, प्रतिनिधी – नदीचे महत्व आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचले आहे. पुराणांमध्येदेखील नदीचे महत्व विशद केलेलं आहे. आजूबाजूला पर्यावरण क्षेत्रात एवढ्या चांगल्या संस्था आणि व्यक्ती काम करत असताना सुद्धा आपण समाज म्हणून नदीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची खंत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केली.
लहानपणी सर्वांनी वाहत्या ओढ्यातील पाणी ओंजळीने पिलेलं आहे, मात्र आता आपण पाण्याची एवढी वाताहात लावलेली आहे की ते पाणी थेट पिण्यायोग्य राहिलेलं नाही. केवळ शासन आणि सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता नदी स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नद्यांच्या आरोग्यावरच आपले आरोग्य आणि भवितव्य अवलंबून असल्याने नद्यांचे संवर्धन करून त्यांची शाश्वतता राखणे ही काळाची गरज आहे. वनराईच्या ‘शाश्वत नद्या’ या विशेषांकामुळे नद्यांना स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्याच्या कार्यमोहिमांना बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरील पुणे पुस्तक महोत्सवामध्ये ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ या वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले की, दैनंदिन जीवनात रासायनिक घटक असलेले साबण, शाम्पू, टूथपेस्ट, डिटर्जंट, फिनाइल, कीटकनाशके अशा अनेक वस्तू वापरत असतो. याद्वारे नैसर्गिकरित्या विघटन न होऊ शकणारे कित्येक रासायनिक घटक घराघरांतून सांडपाण्याच्या स्वरूपात नद्यांमध्ये मिसळत असतात. त्यामुळे अशी घातक रसायनयुक्त उत्पादने नाकारून त्याऐवजी निसर्गस्नेही व पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करणे गरजेचे आहे. आपण केलेल्या चुकांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा विशेषांक केवळ संग्रही न ठेवता याचे वाचन, मनन चिंतन आणि कृती केल्यास निश्चितपणे पर्यावरणाचे रक्षक होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो.
सागर धारिया म्हणाले की, नदी हा आपल्यासाठी केवळ पाण्याचा स्त्रोत नसून आपला इतिहास, भूगोल, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा तो एक दुवा आहे. नद्यांवर फक्त धरणे बांधून आपल्याला जलसुरक्षा साधता येणार नाही, तर ‘गाँव का पानी गाँवमें, और खेत का पानी खेतमें’ हा विचार तळागाळामध्ये रुजवून दुष्काळ व पाणी टंचाईसारख्या समस्यांवर मात करता येईल. याच भूमिकेतून गेल्या चार दशकांपासून ग्रामीण भारतामध्ये पाणलोट व्यवस्थापन तंत्राचा वापर करून ‘वनराई’ संस्था नदी संवर्धनासाठी हातभार लावत आहे.
अमित वाडेकर म्हणाले की, नद्यांच्या शाश्वततेसाठी ‘वनराई’च्या माध्यमातून सर्व स्तरांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. ‘शाश्वत नद्या : उगमापासून सागरापर्यंत…’ हा ‘वनराई’ वार्षिक विशेषांकही याचाच एक भाग आहे. या विशेषांकातून नद्यांबाबतच्या समस्या, उपाययोजना, प्रयोग, यशकथा इत्यादींवर समग्र चर्चा घडवून आणण्यात आली आहे. त्यामुळे हा विशेषांक वाचकांना नदी संवर्धनासाठी प्रेरित करेलच. शिवाय दिशादर्शकाचीही भूमिका बजावेल असा आम्हाला विश्वास आहे. या कार्यक्रमाचे आभार रोहिदास मोरे यांनी मानले, तर सुजाता मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले.