पुणे-सरहद आयोजित दिल्ली येथे भरवल्या जाणाऱ्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद संस्थेकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरहद स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कात्रज येथे “गौरव महाराष्ट्राचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र येथे तज्ञ म्हणून कार्यभार पाहत असणारे डॉ. सुरेश इसावे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. डॉ.सुरेश इसावे हे टिळक कॉलेजमध्ये कार्यरत असून वेगवेगळ्या संस्थांचे सभासद ही आहेत .सरांना २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच डॉ. इसावे यांना अभ्यासाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे त्यामुळे त्यांनी ट्रेकिंग ग्रुप सुरू करून शंभर पेक्षा जास्त किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली. असे पाहुणे कार्यक्रमाला लाभणे ही आनंदाची गोष्ट आहे.
“गौरव महाराष्ट्राचा “या कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीत ’जय जय महाराष्ट्र माझा’ने झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रंगांची जणू उधळणच झाली. त्यामध्ये वेगवेगळे लोकनृत्य ,गणेश वंदना ,लावणी, कोळीनृत्य, सवाल- जवाब, गोंधळ, धनगर नृत्य ,शेतकरी नृत्य, तसेच रामायण ,मराठी शोले, हास्यरस, नारीशक्ती अशा अनेक कार्यक्रमाने महाराष्ट्राचे वेगळेपण दिसून आले. महाराष्ट्राच्या कोसा कोसावर बदलणाऱ्या मराठी भाषेचे, संस्कृतीचे व अस्मितेचे प्रदर्शनच जणू मांडले होते. यामधून विविधतेतून एकता याचे जणू दर्शन झाले. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध आणि आकर्षक कार्यक्रमाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमासाठी सरहद संस्थेचे विश्वस्त श्री. शैलेश वाडेकर ,श्री.अनुज नहार , संस्थेतील विविध विभाग प्रमुख कविता वानखेडे, मनीषा वाडेकर , सुजाता गोळे, रुबीना देशमुख , तसेच सर्व विभागाचे पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ .सोनाली सहाने यांनी केले.