पुणे: श्री स्वामी सेवा (दिंडोरी प्रणीत) केंद्र व श्री हनुमान धर्मदाय ट्रस्ट, विश्रांतवाडी यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त वडगावशेरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा. बापूसाहेब पठारे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी स्वामी समर्थांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दत्त जयंती सप्ताहसोहळा ९ ते १६ डिसेंबर यादरम्यान साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये धार्मिक उपक्रमांसोबत समाजसेवेवरही विशेष भर देण्यात आले. समारोप सोहळ्यादरम्यान सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे यांनी महिलांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले. सत्कार स्वीकारताना आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, “स्वामी सेवा केंद्र व श्री हनुमान धर्मदाय ट्रस्ट यांनी महिलांना अधिकाधिक सहभागासाठी प्रोत्साहित केले आहे, जे की अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांचा सहभाग समाजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. याबरोबरच संपूर्ण सोहळ्याची एक खास बाब अशी की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के अध्यात्माचा समतोल साधला गेला जे बघून मी भारावून गेलो.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या सेवासप्ताहात संस्कृत आणि प्राकृत भाषांच्या माध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा उत्कृष्ट मेळ साधला आहे, ज्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.”
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. तुकाराम निकम, सचिव श्री. रमेश कदम, विद्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप पुरकर यांच्यासह स्वामी केंद्राचे सेवेकरी सौ. वैशालीताई गिते, शिंदेताई, श्री. गजानन क्षीरसागर, संतोष कराळे, शेखर वाल्हेकर, अनिल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.