मनीषा नृत्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण
पुणे :
ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पं.मनीषा साठे यांनी स्थापन केलेल्या मनीषा नृत्यालयाचा ‘कथक नृत्यसंध्या’ हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला.हा ४९ वा वार्षिक कार्यक्रम होता.या कार्यक्रमाद्वारे मनीषा नृत्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले.पं.मनीषा साठे यांच्यासह त्यांच्या २०० विद्यार्थीनींनी विलोभनीय कथक नृत्याचा आविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार,’भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट ‘चे संचालक डॉ.शारंगधर साठे,स्वाती पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.पं.मनीषा साठे यांनी सादर केलेल्या कृष्णवंदनेने,श्रीकृष्ण स्तुतीने कार्यक्रमाची बहारदार सुरवात झाली. त्यांच्या मनमोहक एकल नृत्यप्रस्तुतीनंतर त्यांनी १० ज्येष्ठ विद्यार्थीनींसह १६ मात्रांचा त्रिताल सविस्तरपणे ,अतिशय लालित्यपूर्ण आणि जोशपूर्ण पद्धतीने सादर केला.राम भजन,त्रिवट,सरगम, तराणा अशा सुंदर रचनांबरोबर, लहानग्या शिष्यांनी विविध नृत्यप्रकार सादर केले.ते सर्वांच्या मनाला आनंद देऊन गेले. सर्वात लहान शिष्यांनी रिंग चे प्रॉपस् वापरून कल्पक आणि छंदबद्ध नृत्य सादर केले.शंकराच्या स्तुतीपासून शिवाजी महाराजांच्या वीरगाथेपर्यंत सर्व विषय या ३ तासाच्या कार्यक्रमात सुंदर नृत्य संरचनांमधून मांडले गेले.उपस्थित रसिकांची या सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली.
पूनम गांधी,वल्लरी आपटे यांनी प्रास्ताविक केले. गुणी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.मनीषा नृत्यालयाच्या वतीने आणि शांभवी दांडेकर (एसआयएसके,अमेरिका), मीनल चक्रदेव(एमएपीए,अमेरिका), पूर्वी भट (अमेरिका) यांच्या सहकार्याने राधा ठकार,ग्रीष्मा वसंत,श्रेया जाधव,स्वरा राऊत,मैथिली पुंडलिक या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आल्या. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मनीषा नृत्यालयाची वेबसाईट व लोगो पुन्हा नव्याने तयार करण्यात आला असून त्याचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. जयदीप वैद्य आणि अर्पिता वैशंपायन(गायन),आकाश तुपे(पखवाज),कौशिक केळकर(तबला),यशवंत थिटे(हार्मोनियम),धवल जोशी(बासरी)ओंकार उजागरे (सिंथेसायझर)यांनी सुरेल साथसंगत केली.स्वानंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
मनीषा नृत्यालयाची १९७५ मध्ये स्थापना झाली. मनीषा नृत्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याने पुढच्या वर्षी प्रत्येक महिन्यात एक उपक्रम, विविध कार्यक्रम, कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत, अशी घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.