पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोवेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर झागराम007 (कोळसा मंत्रालय ), वोल्ट एसेस (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय), मावेरिक्स (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह प्रथम क्रमांकाला गवसणी घातली. तर द ऑलिम्पियन्स,पॅराडॉक्स इनोव्हेटर, रेल मॅनिक्स, निदान 7.0 (सर्व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) यांनी आपापल्या गटात संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला.एसआयएच-2024 या पाच दिवस चाललेल्या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे निवड झालेले महाराष्ट्रातील एकमेव नोडल केंद्र होते. ज्यात, देशातील ३० राज्यांतील जसे की, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, केरळ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील एकूण २८ संघांची निवड झाली होती. या स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय कोळसा मंत्रालय, रेल्वे व मेट्रो, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयांसमोर असणाऱ्या विविध समस्यांवर पर्यायी उपाय देण्याचे काम केले. त्यामध्ये अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघाच्या नवकल्पनांचे परिक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून प्रत्येकी एक लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेचा समारोप समारंभ तथा बक्षीस वितरणासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार, डसॉल्ट सिस्टिमचे कार्याध्यक्ष सलीम हुझेफा, भारत सरकारच्या इनोवेशन सेलचे संचालक योगेश ब्राम्हणकर, ‘एआयसीटीई’चे उपसंचालक डाॅ.प्रशांत खरात, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डाॅ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल अधिकारी डाॅ.रेखा सुगंधी, इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन, डाॅ.निशांत टिकेकर, प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त डाॅ.पुलकुंडवार यावेळी बोलताना म्हणाले, एसआयएच-2024 ही केवळ स्पर्धा नव्हती तर विद्यार्थ्यांच्या इनोवेशनचा एक मेळा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनेतून भारत सरकारच्या विविध मंत्रालयांसमोरील समस्यांवर सुचवलेले उपाय पाहताना, आपण विकसित भारताच्या संकल्पनेपासून आता फार दूर नाहीत याचा प्रत्यय आला. आपल्या देशातील युवा पीढी ही आपल्या विकसित होण्याच्या वाटचालीत अत्यंत महत्वाची भूमिका बजाविणार आहे, आणि अशा या युवकांना त्यांच्या नवकल्पना जगासमोर मांडण्यासाठी एसआयएच-2024 सारखे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकारचे खूप अभिनंदन व आभार. तसेच, या स्पर्धेच्या आयोजनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनतही उल्लेखनिय आहे, असेही ते पुढे म्हणाले.
योगेश ब्राम्हणकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या विविध समस्यांचा आढावा घेताना, भारताला विकसित होण्यासाठी एआय, स्मार्ट अॅटोमेशन सारख्या गोष्टींचे महत्व अधोरेखित केले. तसेच, त्यांनी स्पर्धेच्या अचून आयोजनसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कौतुक आणि आभारही मानले. विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.दुबे यांनी तर आभार इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा.स्नेहा वाघटकर यांनी केले.
चौकट
स्पर्धेचा निकाल
- कोळसा मंत्रालय- झागाराम007 (श्री साईराम इंजिनिअरिंग महाविद्यालय, कांचीपूरम, तामिळनाडू)
- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- वाॅल्ट एसेस (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हमीरपूर)
- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय – मावेरिक्स (राष्ट्रीय इंजिनिअरिंग संस्था, म्हैसूर, कर्नाटक)
- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय – द ऑलिम्पियन्स (स्वामी केशवनंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, जयपूर, राजस्थान)
- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय – पॅराडॉक्स इनोव्हेटर (हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उत्तर परगणा, पश्चिम बंगाल)
- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- रेल मॅनिक्स (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर)
- गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- निदान 7.0 (मुजफ्फरपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिहार)
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/12/DSC_5416-1024x683.jpg)