परभणी- शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता. पण आता पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी एक विद्यार्थी होता. त्याने परभणी येथील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. सध्या त्याची परीक्षा सुरू होती. त्यासाठी तो पुण्याहून परभणीत आला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सोमनाथ हा एलएलबीच्या तिसऱ्या वर्षात होता.
पोलिसांच्या हाती सोमनाथचे आधार कार्डही लागले आहे. त्यावर त्याची जन्मतारीख 23 जुलै 1989 अशी नमूद आहे. तर पत्ता पुण्यातील भोसरी भागातील दाखवण्यात आला आहे. यावरून तो मूळचा पुण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची आई व भावाने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. तिथे त्यांनी पोलिस कारवाईचा निषेध करत आपल्याला न्याय हवा असल्याचा आकांत केला.
माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता. त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा.
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. परभणीत संविधानाची विटंबना का करण्यात आली? याविषयी अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई ही समन्वयित होती का? हे ही समजत नाही. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मल्टिपल इंज्युरिज म्हणजे मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आहे. मी परभणीत अंत्यविधी होईपर्यंत थांबणार आहे. हे सर्वकाही शांतेत पार पडण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत.
पोलिस कारवाईत जी घरे फोडण्यात आली, त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. आरोपींवर कारवाई करावी. पुतळ्याच्या आसपास झालेला लाठीचार्ज पोलिसांनी केला की पोलिसांच्या वेशातील दुसऱ्या कुणी केला? याचा शोध घ्यावा लागेल. ज्यांना मारहाण झाली त्यांच्या केसेस जिल्हा न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना सर्व वकिलांना देण्यात आल्यात, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

