परभणी -येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अर्थात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. परिणामी, आंबेडकरी अनुयायांत संतापाची तीव्र लाट उसळली आहे.परभणी शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम ऑन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परभणीला भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासह त्यांच्या न्यायासाठी लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्थानिक गेस्ट हाऊसमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. त्यात त्यांना पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीची माहिती देण्यात आली. त्याचे अनेक व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले.
सोमनाथचे पार्थिव पोलिसांनी अडवले, आंबेडकरांचा हस्तक्षेप
दुसरीकडे, पोलिस प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे नेताना रस्त्यात पाचोड येथे रोखून धरला आहे. अॅडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी एका ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली. पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून परभणीला घेऊन जात होतो. आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकरी जनतेची सूर्यवंशी यांच्यावर परभणीत अंत्यसंस्कार व्हावेत अशी इच्छा आहे. पण पोलिस व प्रशासन आम्हाला रस्त्यात अडवून मृतदेह लातूरला नेण्याचे सांगत आहेत, असे तेलंग यांनी सांगितले आहे.

