पुणे : अफाट कार्यक्षमता, कामकाजातील पारदर्शकता, सूत्रबद्ध नियोजन, दूरदृष्टी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कल्पक विचारसरणी आणि विकसित भारताचे स्वप्न उराशी बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू आहे. गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यातही अमूलाग्र बदल झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये काही काळासाठी युद्धविराम करून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणले आहे. या मुळेच नरेंद्र मोदी हे केवळ देश पातळीवरील नेते नसून जागतिक पातळीवरील मुत्सद्दी राजकारणी आहेत हे सिद्ध होते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या ‘मोदी 3.0’ या कार्यक्रमाचे रविवारी (दि. 15) आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रकाश जावडेकर बोलत होते. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे, सचिव अमृता कुलकर्णी, माजी अध्यक्ष दीपक शिकारपूर मंचावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती, विचारप्रणाली, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, समन्वयाची भूमिका आदी वैशिष्ट्यांसह व्हिजन 2047 या विषयी प्रकाश जावडेकर यांनी मते मांडली. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नरेंद्र मोदी संन्यस्त कर्मयोगी आहेत. त्यांनी काळाची गरज ओळखून सुरू केलेला समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) प्रभावी वापर, ऑनलाईन पेमेंट पद्धती, मन की बात, परीक्षा पे चर्चा, हर घर शौचालय, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, संविधान सन्मान आदी क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य या मुद्द्यांकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले.
मोदी यांच्या कार्यकाळात संविधानाचा योग्य सन्मान झाला असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 23 वर्षे कार्यरत असणारे मोदी हे एकमेव राजकीय व्यक्तीमत्व आहे. मोदींच्या पारदर्शी कारभाराची माहिती देताना त्यांच्या कार्यकालावधीत एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दैनंदिन व्यवहारात सरकारची गरज कमी करत मोदी यांच्या विविध योजनांमुळे जनतेच्या जगण्यात अमूलाग्र बदल होऊन सुलभता आली आहे. जागतिक पातळीवर घेतलेल्या आर्थिक निर्णयांमुळे देशाला झालेल्या लाभांविषयी जावडेकर यांनी माहिती दिली.
मोदी यांच्या आवडीनिवडी सांगताना जावडेकर म्हणाले, योगासने, व्यायाम, सतत कार्यमग्नता, शुद्ध शाकाहारी जेवण आवडीचे आहे. मोदी यांना गुजराती पद्धतीचे जेवण अधिक पसंत असून महाराष्ट्रातील मेतकुटही मनापासून आवडते.
व्हिजन 2047 अंतर्गत आर्थिक महासत्ता, नदी जोड प्रकल्प, सौरउर्जा, पवनउर्जा, वक्फ बोर्ड, शैक्षणिक धोरण याविषयी सुरू असलेल्या कार्याचा उहापोह केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मंजिरी शहाणे यांनी तर स्वागत डॉ. शंतनू देशपांडे यांनी केले. आभार विशाल कुलकर्णी यांनी मानले.