ज्यांच्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच मोदींनी उपमुख्यमंत्राची शपथ दिली,हे कोणत्या संविधानात लिहिले आहे?
मुंबई- दहाव्या शेड्युल्डनुसार ज्या पद्धतीने आमदार फोडले, ते अपात्र ठरायला पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नरेंद्र मोदींच्या दबावाखाली तसा निर्णय दिला नाही. चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. मोदी ज्या पद्धतीने हे राज्य चालवत आहेत, ते संविधानात विरोधात आहे. संविधान देशाचा आधार असून तो नरेंद्र मोदी यांनी उद्ध्वस्त केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान आहे. परंतु, विधानसभा किंवा लोकसभेत विरोधीपक्ष राहू नये, विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा, तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधीपक्षांच्या मागे चौकशीच ससेमिरा लावावा, त्यांना तुरुंगात टाकावे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणे हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिले आहे? विरोधी पक्ष राहू नये, अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. ईडी-सीबीआय भाजपच्या घरी कधी गेली हे दाखवावे, असाही हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.आमच्याकडे असणाऱ्या लोकांकडे ईडी-सीबीआय गेली होती, ते आज मोदींच्या मांडीवर बसले आहेत. मोदी त्यांची आईच्या ममतेने काळजी घेत आहेत. मोदींनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच मोदींच्या उपमुख्यमंत्राची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानात लिहिले आहे? असा सवाल करत संजय राऊत यांनी जोरदार टीका केली
मोदी देशाला लाभलेले 65 वर्षांतील असत्य बोलणारे सगळ्यात महान पंतप्रधान आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. सत्यमेव जयते हा संविधानाचा नारा आहे. पण गेल्या 10 वर्षांत फक्त असत्याचा विजय करण्याचे काम मोदी काळात झाले आहे. गौतम अदानी नरेंद्र मोदींचा नवीन संविधानकर्ता असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली. अदानीला विरोध करणारे संविधान विरोधी असल्याचे मोदींना सांगायचे आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून काय दिवे लावलेत? असा सवालही संजय राऊत यांनी केला. 370 हटवून त्यांनी उपकार केले का? आजही तिथे जवानांच्या हत्या होत आहेत. तिथला तरुण बेरोजगार आहे. नवीन उद्योग आला नाही. आजही सैन्याच्या ताकदीवर राज्य सुरू आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. 370 कलम हटवले, आता पुढे काय? असा सवालही राऊत यांनी केला.
काश्मीरचा विषय संपलाय, हिंमत असेल मणिपूरला जाऊन दाखवा, असे आव्हानी संजय राऊत यांनी मोदींना केले. गौतम अदानीला मणिपूरमध्ये सरकारची एखादी प्रॉपर्टी घ्यायला सांगा आणि तिथे उद्योग काढा. गौतम अदानीची हिंमत आहे का? असेही संजय राऊत म्हणाले.
इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी उघडपणे आणली होती. तुम्ही आणीबाणीपासून धडा घ्या, असा सल्ला राऊत यांनी भाजपला दिला. नागरिकांचे हक्क संपुष्टात आणल्यावर जनता उद्रेक करते. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत दाखवली. पराभव पत्करला, पण लोकशाहीचे रक्षण केल्याचा दावा राऊत यांनी केला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. मोदींची इंदिरा गांधींप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत आहे का? असा सवालही राऊत यांनी केला. देशात झालेल्या निवडणुकांवर लोकांचा विश्वास नाही, हीच संविधानाची हत्या आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.