श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे ; १२७ व्या सोहळ्यानिमित्त दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी
पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या गजरात आणि शेकडो भाविकांच्या गर्दीने फुललेल्या दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा उत्साहात पार पडला. कीर्तनकार ह.भ.प.तेजस्विनी कुलकर्णी यांच्या कीर्तनानंतर झालेला नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा डोळ्यात साठविण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली. दत्तगुरुंच्या जयघोषाने दुमदुमलेला बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता. मंदिरात १२७ व्या वर्षी साज-या झालेल्या दत्तजन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती.
दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. शनिवारी सायंकाळी ५ वाजून ५७ मिनिटांनी श्री दत्तजन्म सोहळा झाला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करुन दिगंबरा, दिगंबरा… असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर दत्तगुरुंच्या पादुकांची भव्य पालखी नगरप्रदक्षिणा मंदिरातून वाजत-गाजत निघाली. वैभवशाली सुवर्णरथ, पारंपरिक दिंडी, अश्व बग्गी, नगारा वादन व वाद्यपथकांच्या जल्लोषात भाविक देखील सहभागी झाले होते.
दत्तमंदिरापासून निघालेली पालखी रामेश्वर चौक, टिळक पुतळा मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मार्गे मंदिरात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे उपस्थित होते.
शनिवारी सकाळी ६ वाजता ट्रस्टचे माजी विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व हेमलता बलकवडे यांच्या हस्ते श्री दत्तयाग झाला. सकाळी ८ वाजता प्रात: आरती आमदार हेमंत रासने व मृणालिनी रासने यांच्या हस्ते तसेच दुपारी १२.३० वाजता सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर, जिल्हा न्यायाधिश किरण क्षीरसागर व सुहाना मसालेचे राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते माध्यान्ह आरती करण्यात आली. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दत्तमहाराजांचे दर्शन घेतले.
दत्तजन्म सोहळ्यानंतर सायंकाळी ७ वाजता सायं आरती सारथीच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता व अशोक काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कांचन व संजीव जाधव, पोलीस उपायुक्त डॉ. संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते झाली. भक्तांसाठी सकाळी ६ पासून मंदिर खुले करण्यात आले असले तरी रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांनी स्वहस्ते अभिषेकाचा देखील लाभ घेतला.