पुणे- आंबेगावच्या निलेश भरम याच्या कडून गुन्हे शाखेच्या युनिट २ ने २ पिस्टल व ६ काडतुसे जप्त केली आहेत.निलेश भरम हा रेकोर्द्वारील गुन्हेगार असून कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याच्यासाठी काम करतो असा पोलिसांचा दावा आहे.
निलेश ज्ञानेश्वर भरम (वय ३५, रा. साई सिद्धी चौक, आंबेगाव)याला भारती विद्यापीठ पोलिसांनी २०१६ मध्ये निलेश भरम याला पकडले होते.त्यावेळी गँगस्टर रवी पुजारीसाठी तो काम करीत होता. पुणे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाई ही केली होती. निलेश भरम याच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ, सहकारनगर, स्वारगेट, कोंढवा, खडक, बिबवेवाडी, हवेली व पनवेल येथे खुनाचा प्रयत्न, गोळीबार, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी यासारखे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.
काल गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार व संजय जाधव यांना बातमी मिळाली की आंबेगाव येथील दरीपुलाजवळ एक जण अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे. या माहितीवरुन पोलिसांनी तेथे जाऊन बातमीप्रमाणे एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने निलेश भरम असे नाव सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये ८६ हजार रुपयांचे २ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे मिळून आली. आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, निखिल जाधव, विजय पवार, नागनाथ राख, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, अमोल सरडे, संजय आबनावे, प्रमोद कोकणे, पुषेंद्र चव्हाण यांनी केली आहे.