पुणे :पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त आर राजा यांची पुण्यात पोलीस दळणवळण , माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागात पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पोलीस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा येथे बदली करण्यात आली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षकअसताना आर राजा यांची एप्रिल २०२२ मध्ये पुणे शहर पोलीस दलात बदली करण्यात आली होती. आर राजा हे इलेक्ट्रीक इंजिनिअर असून ते २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी उस्मानाबाद, नगर जिल्ह्यात सेवा बजावलेली आहे.मुंबई पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली होती. त्याचवेळी ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली करण्यात आली. देशमुख यांच्या जागी पुण्यातील पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची ऐन गणपती मध्ये बदली झाली होती. देशमुख यांनी आपल्या बदलीविरोधात ‘कॅट’मध्ये धाव घेतली. ‘कॅट’ने देशमुख यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे संदिपसिंह गिल व तेजस्वी सातपुते यांची बदली होऊनही त्यांना त्यांच्या पदावरुन सोडण्यात आले नव्हते. आता तेजस्वी सातपुते यांची पुण्यातच शस्त्र निरीक्षण शाखेत पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.