पुणे:
प्रशासकराज ला येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. शहरातील विविध प्रभागात नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याप्रमाणे अर्थसंकल्प तयार करण्याचे “नगरसेवक” हे माध्यम असते. मात्र गत तीन वर्षे हे माध्यमच अस्तित्वात नसल्याने प्रशासन त्यांच्या सोयीने आणि त्यांच्याकडील विविध खात्यांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पाची रचना करत आहे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
सात आठ हजार कोटींच्या अवाढव्य अर्थसंकल्पात नागरिकांच्या सूचनांना फारसे स्थान नसतेच,
तरी ह्या वर्षीचे अर्थसंकल्प आखताना मूलभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद करावी अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी मांडली आहे.
मोठे प्रकल्प, कारंजे,शिल्प, ज्येष्ठ नागरिक कट्टे, समाज मंदिर,ठिकठिकाणी व्यायामाचे साहित्य बसविणे – अश्या अनेक प्रकल्पांची शहराला गरज आहेच मात्र किमान एक वर्ष ह्या खर्चाला फाटा देऊन मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतुद वाढवावी अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना लिहिलेल्या मागणीपत्रात प्रामुख्याने…
1) मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील खड्डेमय रस्ते हे केवळ डागडुजी न करता ( खड्डे बुजविण्याचे सोपस्कार न करता ) शास्त्रोक्त पद्धतीने नव्याने डांबरीकरण करणे.
2) पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचणाऱ्या ठिकाणी पावसाळी लाईन मोठ्या व्यासाची करणे.
3) ड्रेनेज लाईन बाबतीतही हीच स्थिती असून अनेक ठिकाणी लाईन बदलण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तरतूद करणे.
4) 24×7 पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करणे व जेथे कमी दाबाने पाणी येते तेथे पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देणे.
5) डास निर्मूलनासाठी योग्य निधी ची व्यवस्था करणे, कारण गेले वर्षभर पुणेकर विविध आजारांनी ग्रस्त आणि त्रस्त आहेत आणि त्याच्या मुळाशी डास असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
6) जेथे मेट्रो, उड्डाण पूल व अन्य विकास कामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे अश्या व अन्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणी काम पूर्ण होईपर्यंत पुणे पोलीस व मेट्रो च्या सहकार्याने तात्पुरते ट्रॅफिक वार्डन ठेवणे व त्यांनी दंडात्मक कारवाई (वसुली ) न करता केवळ वाहतूक नियोजनावर भर द्यावा याची दक्षता घेणे.
7) यासह कचरा निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करताना जे भाग हरित आहेत तेथे झावळ्या, फ़ांद्या, पानांचा कचरा याच्या संकलन व विल्हेवाटी साठी विशेष तरतूद करणे.
8) भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर दीर्घाकालीन उपाययोजना करणे.
9) अंधार असणाऱ्या अनेक रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी पुरेश्या विद्युत खांबांची व्यवस्था करणे ( सदर खांब हे Decorative नसावेत तर पुरेसा प्रकाश देणारे असावेत ).
अश्या मागण्यांचा समावेश असून याबाबत आपण मा. खासदार मुरलीधर मोहोळ, शहराचे नेते मा. आ. चंद्रकांतदादा पाटील व सर्व आमदारांशी चर्चा करणार असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.यासह अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या विषयांचा समावेश करता येईल मात्र तूर्तास वरील कामांना प्राधान्य द्यावे असेही खर्डेकर म्हणाले.
अर्थसंकल्पाची आखणी करताना तत्पूर्वी सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत असेही ते म्हणाले.
पुणेकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सर्वजण सहकार्य करतील व
प्रशासन देखील निश्चितपणे यावर सकारात्मक निर्णय घेईल व पुण्याचे वैभव टिकवेल आणि “आपलं पुणं” हे देशातील सर्वोत्तम शहर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल याची खात्री वाटते असेही संदीप खर्डेकर म्हणाले..