पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२७ व्या दत्तजयंती सोहळ्यांतर्गत दत्तजयंतीनिमित्त शनिवार, दिनांक १४ डिसेंबर रोजी पहाटे ६ पासून मंदिर खुले राहणार असून संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तजयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम, दत्तजन्म सोहळा, पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा होणार आहे. दत्तमंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी दिली.
शनिवारी सकाळी ६ वाजता ट्रस्टचे माजी विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व हेमलता बलकवडे यांच्या हस्ते श्री दत्तयाग होईल. सकाळी ८ वाजता प्रात: आरती आमदार हेमंत रासने व मृणालिनी रासने यांच्या हस्ते तसेच दुपारी १२.३० वाजता सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर, जिल्हा न्यायाधिश किरण क्षीरसागर व सुहाना मसालेचे राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते माध्यान्ह आरती होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात कीर्तनकार ह.भ.प.तेजस्विनी कुलकर्णी यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता असून सायंकाळी ५.५७ वाजता दत्तजन्म सोहळा पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सायं आरती सारथीच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता व अशोक काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कांचन व संजीव जाधव, पोलीस उपायुक्त डॉ. संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते होईल.
त्यानंतर पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वैभवशाली सुवर्ण रथातून पारंपरिक दिंडी, अश्व बग्गी, नगारा वादन व वाद्यपथकांच्या जल्लोषात भाविकांसह निघणार आहे. भाविकांच्या स्वहस्ते अभिषेकाची सुविधा सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आली आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.