मुंबई- राज्य सरकारने उच्चपदस्थ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढत त्यांना तत्काळ आपल्या नव्या नियुक्तीचा पदभार सांभाळण्याचे निर्देश दिलेत.आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्याकडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी शुक्रवारी एका विशेष आदेशांद्वारे त्यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्याचे आदेश काढले.
व्ही. राधा यांनी यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे की, प्रिय श्रीमती अश्विनी भिडे, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मा. मुख्यमंत्री यांचेच प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्या जागी केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही आपण धारण करावा.
…अश्विनी भिडे ह्या 1995 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यभर विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे.