मुंबई- बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर काही तरी भूमिका घ्यावी. भाजपचे हिंदुत्व हे केवळ मतापुरते मर्यादित आहे का?, हिंदूंना घाबरुन मते घ्यायची एवढंच त्यांना जमते. बांगलादेशासह मुंबईतही मंदिर सेफ नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशातील गोर-गरीब हिंदूंवर अत्याचार होत आहे. मुंबईतील दादरमधील हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहेत, आता भाजपचे हिंदुंत्व कुठे गेले? हिंदुंच्या मतावर निवडून आले तर मंदिरे वाचवण्यासाठी काय करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुतीचे केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यांना अजून किती राक्षसी बहुमत पाहिजे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सत्तेचा विस्तार हेच भाजपचे स्वप्न आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्या संघासोबत खेळणं कितपतयोग्य आहे असे आदित्य म्हणाला होता. पण त्यावर उत्तर नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक देशाच्या दृष्टीने विषय मांडत आहेत. सत्ताधारी उत्तर देत आहे. असं म्हणतात. पण दुर्देवाने असं होत नाही. महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन चर्चा नको त्या दिशेने भरकटवली जात आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसे आपण एका फोनवर युक्रेनचे युद्ध थांबवले होते तसेच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचे मंदिर जाळण्यात आले. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे. आमच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली. मी सांगितले होतं की रितसर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र द्यावे. कारण त्यांच्यामागे खूप व्याप आहेत. जगभरात फिरायचे असते, भाषणे द्यायची असतात. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांच्या लक्षात आले नसतील. मणिपूरचे अन्याय कळले नाहीत तसंच हिंदूंवरचे अत्याचार कळले नसतील.