नवी दिल्ली–शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल भाजप नेते अमित शहा आणि उद्योजक गौतम अदानी यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यानंतर भाजप शरद पवारांना सोबत घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान उद्योजक गौतम अदानी यांच्या घरी भाजपच्या केंद्रीय नेत्याची आणि राष्ट्रवादीचा नेता भेटला अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली. यामुळे आता या सर्व चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शरद पवार गटाचे मेहबुब शेख यांनी हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळले आहे.
शरद पवार यांना सोबत घेण्यासाठीच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाहीये अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी पवारांशी चर्चा केल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी प्रवीण दरेकरांनी शरद पवार गटाचे आमदार-खासदार सत्तेत राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहू शकतात असे म्हटले होते. त्यानंतर आता या चर्चेने जोर धरला आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवारांशी मंत्रिमंडळ विस्तार, परभणीतील अशांतता या विषयांवर चर्चा केली. राजकारणापलिकडील नाती जपण्यासाठी मी आणि माझे सहकारी आलो होतो. तर 13 डिसेंबरला प्रतिभाकाकींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठीही येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आज पुन्हा अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार असल्याने या चर्चांनी जोर धरला आहे.
2014 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात स्थिर सरकार यावे, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी भाजपला सर्वाधिक 123 जागा तर शिवसेनेला 63, काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्ता स्थापनेसाठी 22 जागा कमी पडत होत्या. यातच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत, असे सूचक वक्तव्य केल्याने शरद पवार स्वत:च भूमिका घेणार आहेत का त्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
देशाच्या अन् राज्याच्या राजकारणात 2029 पर्यंत आता कोणती मोठी निवडणूक होण्याची चिन्हे दिसून येत नाही. कारण महाराष्ट्रात भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. तर केंद्रातील सरकारही आता बऱ्यापैकी स्थीर असल्याचे दिसून येते. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा (272) ही संख्या 32 कमी आहे. एनडीएकडे भाजपशिवाय 14 मित्रपक्षांचे 53 खासदार आहेत. सर्वांना मिळून एनडीएने 293 जागा आहेत. यात चंद्राबाबूंचा टीडीपी 16 जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि नितीश यांचा जेडीयू 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या दोन पक्षांच्या पाठिंब्यावर सध्या केंद्र सरकार दिसून येत आहे. यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात जर काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार भाजपसोबत आले तर त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे या चर्चांना बळ आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अनेक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली. यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचे 41 आमदार निवडून देखील आले. तर शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले आहे. सत्ता नसताना लोकप्रतिनिधी जपण्यासाठी अन् पक्षाच्या भवितव्यासाठी शरद पवार हा निर्णय घेऊ शकतात असे चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत 10 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी 8 जागांवर त्यांच्या पक्षाने तुतारी या चिन्हावर विजय मिळवला आहे. यात अनेकांनी भाजपच्या दिग्गजांचा पराभव केला आहे. यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरीतून भास्कर भगरे, शिरुरमधून अमोल कोल्हे, बीडमध्ये बजरंग सोनावणे, वर्धांचे अमर काळे, अहमदनगरातून नीलेश लंके, भिवंडीतून सुरेश म्हात्रे विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर उमेदवार उभे करत 8 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, अवघ्या 6 महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. यात प्रदेशाध्यक्ष इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील, तासगावचे रोहित पाटील, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, बीडचे संदीप क्षीरसागर, मुंब्रातून जितेंद्र आव्हाड, वडगाव शेरी बापूसाहेब पठारे, करमाळ्यातून नारायण पाटील, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, मोहोळचे राजू खरे, माढ्याचे अभिजीत पाटील यांनाच विधिमंडळात जाता आले.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते अनिल पाटील यांनी दावा केला होता की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, 4 महिन्यात रिझल्ट दिसेल, आश्चर्य वाटू देऊ नका, यामुळे तेव्हाही या वक्तव्याची मोठी चर्चा 15 दिवसांपूर्वी झाली होती.
अजित पवार- शरद पवार भेटीविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. त्यातील काही असे. लोकसभेतील पराभवाची परतफेड अजित पवारांनी विधानसभेत केली. आता त्यांनी डॅमेज कंट्रोलसाठी पावले उचलण्याचे ठरवले असावे. त्याला अर्थातच शरद पवारांची संमती मिळाली आहे.
अजित पवारांनी भाजपला अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे की, भविष्यात भाजपने त्यांना सोडले तर ते पुन्हा काकांसोबत जाऊ शकतात.
मविआचे खरे अस्तित्व शरद पवारांमुळेच आहे. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना काका-पुतण्याच्या एकत्र येण्याची भीती वाटणार आहे. असे झाल्यास महाविकास आघाडी कमकुवत होऊ शकते.
गरज पडल्यास शरद पवार यांच्याशी थेट राजकीय संवाद साधण्यासाठी अजित पवार यांच्या रूपाने भाजपला मोठा पर्याय मिळाला आहे.
लोकसभा, विधानसभेला पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कमी होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे. कारण या निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असलेले पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, असे म्हटले जात आहे.
दरेकर यांचे सूचक विधान
भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत. केंद्रात भाजप युतीचे आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, विकास या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येण्याचा विचार करू शकतील.