नवी दिल्ली- अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता सायंकाळी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा की, भेटीमागे काही वेगळे राजकारण आहे का? अशा चर्चांना सध्या सुरुवात झाली आहे. तर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल, असे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले.
शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील विविध मंत्री पवार यांना शुभेच्छापर संदेश पाठवीत होते. या दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची सहकुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांसह भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह यांनी देखील भेट घेतली आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमित शाह 6 जनपथवरती दाखल झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. काहीच मिनिटांत अमित शाह आणि पवार यांची भेट झाली. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा सत्कार केला तसेच निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. दरम्यान, शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्यामुळे ही भेट झाली असावी, असा अंदाज काढला जात आहे. मात्र, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल.
अजित पवार यांच्यासोबतच खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार हे देखील शरद पवार यांच्या निवास्थानी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो.आज शरद पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील विविध मंत्री पवार यांना शुभेच्छापर संदेश पाठवीत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अमित शाह यांनीही पवार यांना फोन करून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आणि भेटीची वेळ ५ वाजता ठरविली.