मुंबई-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 11 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या प्लेनरी हॉलमध्ये पंचायती राज मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले. केंद्रीय पंचायती राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा.एस. पी.सिंग बघेल हे देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाप्रति त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विविध श्रेणीतील 45 पुरस्कार विजेत्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ठळक वैशिष्ट्यांमध्ये पुरस्कार रकमेचे डिजिटल हस्तांतरण आणि पुरस्कार विजेत्या पंचायतींचे अभिनव उपक्रम अधोरेखित करणारा लघुपट यांचा समावेश होता. याप्रसंगी ‘पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या कामांवरील सर्वोत्तम पद्धती’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील पंचायतींनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याने राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पंचायती राज मंत्रालयाने स्थापन केलेले हे पुरस्कार, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्वोत्कृष्ट पंचायतींची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देतात.
महाराष्ट्राने आपल्या ग्रामपंचायती, तालुका पंचायती आणि संस्थांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचे दर्शन घडवत विविध श्रेणींमध्ये सहा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तालुका, जिल्हा, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरांवर आयोजित केलेल्या स्पर्धेसह हे पुरस्कार पिरॅमिड संरचनेचे अनुसरण करतात. त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक भावनेला चालना देत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने पंचायतींचे मूल्यांकन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 च्या विजेत्यांनी ग्रामीण नवोन्मेष, शाश्वतता आणि समुदाय-चालित उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
1. मान्याचीवाडी: सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (क्रमांक 1)
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 – नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार (क्रमांक 1) जिंकला आहे.
शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांगीण आणि अभिसरण दृष्टीकोनाचा अवलंब करण्यात मान्याची वाडी ग्रामपंचायत सरस ठरली आहे. 420 लोकसंख्येसह, पंचायतमध्ये 98 घरांचा समावेश आहे आणि सहा निर्वाचित प्रतिनिधी (तीन पुरुष आणि तीन महिला) त्याचे नेतृत्व करतात.
या ग्रामपंचायतीने शाश्वत पद्धती आणि एकात्मिक ग्रामीण विकासासाठी आपली वचनबद्धता दर्शवून सर्व 9 शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरण संकल्पनेनुसार अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केले.
2. तिरोडा: सर्वोत्कृष्ट गट पंचायत (क्रमांक 3)
गोंदिया जिल्ह्यातील पंचायत गटाला सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी दाखवलेल्या उत्कृष्ट वचनबद्धतेसाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 – मधील नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या पंचायतीने कुशल प्रशासनाचा आदर्श ठेवून नाविन्यपूर्ण विकास धोरणांचे एकत्रीकरण आणि ग्रामीण वातावरणात टिकाऊपणाला प्रोत्साहन दिले आहे, त्यांच्या या प्रभावी उपक्रमांसाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर हा बहुमान मिळाला आहे.