पुणे- – येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावलेला एक कैदी कारागृह रक्षकांची नजर चुकवून पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या अनिल मेघदास पटोनिया (वय 35) या कैद्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आराेपी अनिल पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावा मधील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा, तसेच 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली होती. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृाहत करण्यात आलेली होती. येरवडा खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था असून त्याची चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते.बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील कैद्यांची हजेरी घेण्यात आलेली हाेती. त्यावेळी पटोनिया आढळून आला नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत लेखी तक्रार देण्यात आली. खुल्या कारागृहातील कर्मचारी राजेंद्र मरळे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली असून, पसार झालेल्या पटोनियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी खुल्या कारागृहास भेट देवून पाहणी केली. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस टकले (मोबाईल 9922995911)करत आहेत.