पुणे, दि. 11: पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 1 जानेवारी 2025 रोजी मोठया प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात 27 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठया प्रमाणात जनसमुदाय खासगी वाहनाने तसेच सार्वजनिक वाहनाने येत असतो. विजयस्तंभाजवळ मोठी गर्दी होऊ नये यासाठी लोणीकंद, पेरणे, वढू खुर्द हद्दीतील काही मोकळया जागांमध्ये येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. तसेच पीएमपीएमएलच्या बसेस थांबण्याकरिता तात्पुरते बसस्टॉप उभारण्यात येतात. या विविध ठिकाणच्या पार्किंगसाठी तसेच सदर कार्यक्रमाच्यावेळी जयस्तंभ परिसरात अनुचित प्रकार घडून आल्यास तात्काळ बाहेर जाण्याकरिता जयस्तंभाच्या बाजूला असलेली जागा अतितातडीची बाहेर पडण्याची (एमर्जन्सी एक्झिट) म्हणून तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष डॉ. दिवसे यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 65 अन्वये खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार लोणीकंद येथील गट क्र. 752, 760, 754, 763, 762, 753, 756, 757, 17, 18, 19, 21,28-2, 10, 1, 309, 125, 129, 130, 131, 132, 194, 197, 198, 183 तसेच वढू खुर्द गावातील गट क्र. 118/1, 119, 121, 122, 123, 128, 173, 174/1, फुलगाव येथील गट क्र. 200/1 ब आणि पेरणे येथील 933/2 अ, 934/2, 1226 या गट क्रमांकातील मोकळया जागा अनुयायांच्या वाहनांच्या पार्किंगकरिता अधिग्रहित करण्यात येणार आहेत. पीएमपीएमएल पार्किंगसाठी लोणीकंद येथील गट क्र. 2, 3, 4/1, 4/2 तर बुकस्टॉलकरिता पेरणे येथील गट क्र. 963/1, 950, 944, 967 या मोकळया जागा अधिग्रहित करण्यात येणार आहेत. याशिवाय पेरणे येथील गट क्र. 489 ही सरकारी गायरानाची जागा अतिरिक्त जमीन असेल.
अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेरणे येथील गट क्र. 1040, 1042 मधील जागा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित करण्यात येणार आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था वक्फ बोर्ड पार्किंग, जीत ढाब्यासमोर, पुणे नगर हायवेवर, शिक्रापूर, तोरणा पार्किंग बजरंगवाडी, शिक्रापूर, टोरांटो गॅस, खालसा पंजाबी ढाबा, चौधरी ढाबा, जातेगाव खुर्द, शंभू महादेव तळेगाव ढमढेरे, कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी, कोरेगाव भिमा बाजारतळ, इनामदार पार्किंग कोरेगाव भिमा, क्रिशा होंडा शोरुम ड्रॉप पॉईंट कोरेगाव भिमा, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पॉईंट कोरेगाव भिमा, वढू बु, हॉटेल वहिनीसमोरील पार्किंग याप्रमाणे पार्किंग, पिकअप पॉईंट, ड्रॉप पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.