पुणे, दि. ११: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा इच्छुक सुशिक्षित बेरोजगार व कारागीर व महिला बचतगटाने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर. खरात यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगाकरीता ५० लाख रुपये तर सेवा उद्योगाकरीता २० लाख रुपये इतकी कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराचे किमान वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती ,जमाती , महिला, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त-जमाती, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि माजी सैनिकांकरीता वयोमर्यादा पाच वर्ष शिथील राहतील.
अर्जदार यापुर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नवीन उद्योजक, कारागिर, संस्था व बचत गट योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. दहा लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण व २५ लाख रुपयावरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण असावा. एका कुटुबांतील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.(कुटुंबाची व्याख्या ही पती पत्नी अशी राहील.)
अर्ज करतावेळी आधारकार्ड, शैक्षणिक दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, लोकसंख्येबाबत ग्रामसेवकाचा दाखला, प्रकल्प अहवाल विहित नमुन्यातील इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म, पॅन कार्ड, गुण् पत्रिका या कागदपत्रांसह छायाचित्र सोबत असावे.
इच्छुकांनी https://maha-cmegp.gov.in/homepage या संकेत स्थळावर अर्ज ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करतांना ‘केव्हीआयबी’ या एजन्सीची निवड करावी. अधिक माहितीकरीता जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, २४-ब पुणे मुंबई रस्ता, शासकीय दुध डेअरी समोर नवीन शिवाजी नगर. एस.टी. स्टॅन्ड शेजारी खडकी पुणे-४११००३ तसेच दु.क्र. ०२० २५८११८५९ आणि -dviopune@rediffmall.com या इमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले आहे.