पुणे- केवळ राजकीयच नाही तर बांधकाम व्यावसायिक,आणि उद्योजक यांच्या वर्तुळातून आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून देखील पुण्याच्या पालकमंत्री पदी कोण हवे असा प्रश्न विचारला तर कोथरुडचे आमदार,माजी मंत्री चंद्रकांतदादा यांच्या नावालाच पसंती मिळते आहे.अजितदादांच्या नावाला मात्र नापसंती मिळते आहे.शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मंत्रीपद दिले तर त्यांचाही नावाला पालकमंत्री पदाची मोठी पसंती या क्षेत्रांतून मिळताना दिसत आहे.
दरम्यान पुण्याचे पालकमंत्रिपदासाठी दोन्ही नेते आग्रही असल्याचे सांगितले जाऊ लागल्याने महायुतीमध्ये मंत्रिपदावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. आताच्या सरकारमध्ये देखील त्यांनाच मिळणार की भाजप चंद्रकांत पाटलांना पुण्याचे पालकमंत्री करणार याकडे सध्या लक्ष लागले आहे.
अजित पवार महायुतीमध्ये आल्यावर त्यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह केला आणि त्यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना सोलापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. जेव्हा चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा देखील अजित पवारांनी जिल्ह्याच्या प्रशासनावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अजित पवार मूळ पुण्याचेच असल्याने त्यांचा पुण्यातील प्रशासनावर पूर्वीपासूनच दबदबा राहिला आहे.सडाफटिंग स्वभाव,रोज पहाटेच उठणे आणि सर्वांना धारेवर धरून कामाला लावणे या गुणांसह..अनेक निवेदने आणि पत्रांना सरळ सरळ केराची टोपली दाखविणे अशा प्रकारच्या तक्रारीसह हम करेसो वृत्ती देखील अजितदादा राबवितात असा त्यांच्यावर आरोप केला जातो तर चंद्रकांतदादा हे मात्र मृदू स्वभावाचे ऐकून घेणारे आणि मध्य मार्ग काढून कोणी नाराज होणार नाही याची काळजी घेणारे म्हणून ओळखले जातात.या दोहोंना पालकमंत्रीपद द्यायचे ठरविले नाही तर सिद्धार्थ शिरोळे यांना पालकमंत्रीपद देऊन पाहावे असे अनेकांचे मत आहे.
अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पुण्यातील राजकारण हे प्रामुख्याने सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने तसेच सहकारी संस्था आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री होणे हे अजित पवारांसाठी महत्त्वाचे आहे. अजित पवार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदारांना निधी देखील उपलब्ध करून देतात. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रिपद भाजप ला मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.