‘युरोकुल’तर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत जगभरातील ६०० युरोलॉजिस्टचा सहभाग
पुणे : “आक्रसलेला मूत्रमार्ग मोठा करण्यासह त्यातील अडथळा दूर करणे, लघवीचा मार्ग शेंड्याऐवजी अंडकोशाजवळून असेल, तर तो नीट करणे, लिंगाची वक्रता घालवणे, ताठरता येण्यासाठी कृत्रिम उपकरण बसवणे, अपघातात तुटलेला लघवीचा मार्ग जोडणे या आणि अशा किचकट शस्त्रक्रिया करून मूत्राशय मार्गाच्या स्वास्थ्यासाठी ‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’ उपयोगी ठरत असून, उपचारांत सुलभता येत आहे,” असे प्रतिपादन युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले.
बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी यांच्या वतीने मूत्राशय मार्गाच्या किचकट शस्त्रक्रियांची दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. युरोकुल येथे डॉ. संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुण्यातील डॉ. पंकज जोशी, लंडन येथील प्रा. अँथनी मंडी, इटली येथील डॉ. गुइडो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉ. गणेश गोपालकृष्णन, लंडन येथील ज्युलियन शाह, डॉ. मिरोस्लाव्ह दोर्डोव्हिक, कतार येथील डॉ. तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉ. ली झाह, डॉ. दिमित्री निकोलावास्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. भारतातील पाचशे, तर विदेशातील ८० तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, दोन दिवसांच्या या कार्यशाळेत एकूण १८ शस्त्रक्रिया झाल्या. ‘युरोकुल’मध्ये झालेल्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात झाले. जगभरातून आलेल्या ५०० हुन अधिक युरोलॉजिस्टने या शस्त्रक्रिया ‘याची देही याची डोळा’ पाहिल्या. कार्यशाळेतून मिळालेल्या नाविन्यपूर्ण माहितीमुळे सहभागी यूरोलॉजिस्टच्या चेहऱ्यावर कुतूहल व आनंद दिसत होता. माझ्याकडे असलेले ज्ञान इतरांना देऊन चांगले युरोलॉजिस्ट तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे.
‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल, तर रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोषाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो. अपघातामध्ये किडनी व लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटल्याने पोटात होणारी लघवी थांबवण्यासाठी नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या साह्याने करण्यात आले. यासह अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रोबोटमार्फत इथे करण्यात आल्याचे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.
प्रा. मंडी व प्रा. ली जाह म्हणाले की, पूर्वी मूत्रमार्ग मोठा करण्यासाठी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया, स्वतः नळी घालून उपाययोजना कराव्या लागत. आता या उपचारांमुळे रुग्णांचे जीवन सुसह्य झाले आहे. ‘रिकंस्ट्रक्टिव्ह युरोलॉजी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘युरोकुल’ची सामाजिक बांधिलकी’
‘युरोकुल’विषयी बोलताना भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या, ‘युरोलॉजी’ व ‘नेफरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे.